पनवेल : नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची देशभर उदाहरणे दिली जात आहेत, मात्र दुर्लक्षामुळे आता यातील काही स्थानकांवर प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. येथील मानसरोवर रेल्वे स्थानकावर तर धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. पाणी नसल्याने शौचालयांतून येणारी दुर्गंधीमुळे प्रवासी त्रस्त आहेत. तर महिलांसाठी असलेल्या शौचालयाचा पुरुषांकडून वापर सुरू आहे.
कामोठे येथील सिटिझन फोरम (कफ) या समाजिक संस्थेच्या रंजना सडोलीकर यांनी प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत गुरुवारी तेथे जाऊन पाहणी केली व या समस्यांचे चित्रीकरणही केले. हे सर्व त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहे.
या शौचालयात महिला व पुरुषांसाठीच्या शौचालयात विभाजनाची भिंतच उभारलेली नाही. काही फळ विक्रेत्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी या शौचालयाचा वापर केला जात आहे. एवढेच नव्हे तर या शौचालयातील जागेचा वापर धुतलेले कपडे सुकविण्यासाठी होत आहे. पाणी नसल्याने शौचालयांची स्वच्छता राखली जात नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. तसेच पुरुषांकडून महिलांच्या स्वच्छतागृहाचा वापर होत आहे.
मानसरोवर रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहाचे चित्रीकरण सर्वासाठी प्रसारित केले आहे. पुरुषांचा वावर असल्याने एकटी महिला स्वच्छतागृहाचा वापर करायला धजावेल का? आपण कुठल्या आडगावात राहतो की आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातलेल्या शहरांचे शिल्पकार म्हणून मिरवणाऱ्या सिडकोच्या शहरात हा प्रश्न उपस्थित होतो.-रंजना सडोलीकर, सचिव, कफ संघटना (कामोठे)

Story img Loader