नवी मुंबई : महामुंबई क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, यासाठी सिडकोने चार मेट्रो मार्गाची आखणी केली असून यातील बेलापूर ते पेंधर हा मेट्रो मार्ग अंतिम टप्प्यात आहे. या मार्गाचा शुभारंभ कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असून सिडकोवर आता आणखी एक नवीन मेट्रो मार्ग उभारण्याची जबाबदारी आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी राज्य शासनाकडे मानखुर्द ते पुढे नवी मुंबई विमानतळ दरम्यान मेट्रो मार्ग उभारण्याची जबाबदारी सिडकोला देण्याचा प्रस्ताव सादर केला होता, त्याला शासनाने हिरवा कंदील दाखवल्याचे ट्वीट सिडकोने केले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)कडून मुंबईत मेट्रो जाळे विणण्याचे काम जोरात सुरू आहे. सध्या ही सेवा मानखुर्दपर्यंत प्रस्तावित आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द या ११ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गानंतर मानखुर्द ते वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूपर्यंतच्या मेट्रो मार्गाची उभारणी आता सिडको करणार असून त्यापुढे बेलापूर ते नवी मुंबई विमानतळ या मेट्रो मार्गाचे सिडकोने अगोदर नियोजन केले आहे. मानखुर्द ते बेलापूर या दहा किलोमीटर मार्गाची सिडको उभारणी करणार आहे.