भूसंपादनाची किचकट प्रक्रिया नसतानाही फक्त ८० टक्के काम
साडेतीन वर्षांत बेलापूर ते पेंदार या पहिल्या टप्यात खडखडणारी नवी मुंबई मेट्रो प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना आणि नव्या स्मार्ट सिटी प्रकल्पामुंळे पुढील दोन वर्षांसाठी रखडली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मेट्रो रेल्वे सेवा आता डिसेंबर २०१८ पर्यंत अनुभवण्यास मिळणार आहे. भूसंपादनाची किचकट प्रक्रिया नसलेल्या या प्रकल्पातील व्हायडक्टचे काम केवळ ८० टक्के झाले असून याशिवाय सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, ट्रक, रोलिंग स्टॉक ही कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.
मुंबई मेट्रोचे काम सुरू असताना मे २०११ रोजी खारघर येथून नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. एकूण साडेचार हजार कोटींच्या या प्रकल्पातील पहिला टप्पा दोन हजार कोटींचा असून तो बेलापूर रेल्वे स्टेशन ते पेंदार या ११ किलोमीटरदरम्यान आहे. या मार्गातील व्हायडक्टचे काम सध्या सुरू असून सायन पनवेल महामार्ग व तळोजा येथे भर रस्त्यावर हे मेट्रो पूल टाकण्याचे काम करावे लागणार आहे. त्यासाठी या मार्गावर मेगा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. मुंबईतील प्रवाशी लोकसंख्या एवढी नवी मुंबईची प्रवासी लोकसंख्या नसल्याने हा प्रकल्प संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिडकोने सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना वसाहत आणि स्मार्ट सिटी या प्रकल्पांना अधिक महत्त्व दिले आहे. नवी मुंबई मेट्रो मार्ग पूर्ण करण्याची मुदत ही डिसेंबर २०१५ पर्यंत होती.
साडेतीन वर्षांत ही सेवा प्रवाशांसाठी खुली केली जाईल असे आश्वासन उद्घाटन कार्यक्रमात सिडकोच्या वतीने देण्यात आले होते. त्यामुळे मे २०११ रोजी सुरू झालेले हे काम डिसेंबर २०१४ पर्यंत होणे अपेक्षित होते पण चीनवरून येणाऱ्या रोलिंग स्टॉकमुळे हा प्रकल्प एक वर्षांने रखडल्याचे सिडकोच्या वतीने सांगण्यात येत होते मात्र या प्रकल्पाला पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकरा किलोमीटर मार्गावरील रेल्वे स्टेशन उभारणीचे ५० टक्के काम झाले असून डेपोच्या कामातही तेवढीच प्रगती झाली आहे.
ही काम पूर्ण न झाल्याने सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, रोलिंग, ऑटो फेअर यासारख्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे २०१४-१५ मध्ये खडखडणारी नवी मुंबई रेल्वे आता चांगलीच रखडली असल्याचे दिसून येत आहे.
उशीरामुळे उशीर
हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर सिडको साडेआठ किलोमीटरच्या खांदेश्वर तळोजा मार्गाला हात घालणार होती. त्यानंतर पुन्हा तळोजा ते पेंदार असा दोन किलोमीटर लांबीचा मार्ग उभारला जाणार आहे मात्र पहिलाच मार्ग तब्बल दोन वर्षे रखडल्याने आता पुढील मार्गाना २०२० उजाडणार असे दिसून येत आहे. हाच मार्ग नंतर मुंबईला घाटकोपर येथून जोडण्याची सूचना पुढे आली आहे.