बेकायदा बांधकामांना पायबंद घालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे परिपत्रक
नवी मुंबई : औद्योगिक क्षेत्रातील मोकळया भूखंडावर दिवसेंदिवस अनधिकृत झोपडय़ांची अतिक्रमणे वाढत असून यावर कारवाई करण्यात एमआयडीसी क्षेत्र अधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याने हे अतिक्रमण वाढत आहे. तसेच यावर काटेकोरपणे अंमलबजावणी करून सक्तीची कारवाई करून हे भूखंड अतिक्रमण मुक्त करावे, असे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिपत्रक काढून दिले आहेत.
काही वर्षांपासून एमआयडीसी भागातील मोकळ्या भूखंडांवर झपाटय़ाने अतिक्रमण होत आहे. या भागात बऱ्याच ठिकाणी भूमाफियांकडून झोपडय़ांचे साम्राज्य वाढत आहे. मात्र, या भागात एमआयडीसी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून, विभाग अधिकाऱ्यांकडून तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने सक्तीची कारवाई होत नसल्याने हे अतिक्रमणाचे जाळे वाढत असल्याचे मत या परिपत्रकातून व्यक्त करण्यात आले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या अतिक्रमणाला तेथील अधिकारीच जबाबदार असल्याचेही त्यांनी यात नमूद केले आहे.
संबंधित अधिकारी अतिक्रमणावर वेळोवेळी कारवाई करत नसल्याने तसेच कारवाईकडे कानाडोळा करीत असल्याने, आज परिस्थिती ओढवल्याचे यात म्हटले आहे. एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडांवरील अतिक्रमणामुळे महामंडळाच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. याकरिता एमआयडीसी भागात दिवसेंदिवस अतिक्रमणाचे जाळे वाढत असून त्याला पायबंद घालणे गरजेचे आहे. या अतिक्रमणावर कारवाई करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित विभाग अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांचीच आहे, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले.
अतिक्रमण झाल्यास गंभीर दखल
१ जानेवारी २०२०रोजी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुन्हा परिपत्रक काढले आहे. यात कडक सूचना देण्यात आल्या असून अतिक्रमण रोखणे, भूमापक व अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी वरिष्ठांना अतिक्रमणाबाबत माहिती देणे, अतिक्रमण भागाचे सीमांकण करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पुढे भविष्यात एमआयडीसी भागात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले तर त्यास विभागातील सर्व अभियंता, तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तू शास्त्रज्ञ व विशेष नियोजन प्राधिकारण यांना संयुक्तपणे जबाबदार धरण्यात येईल व याची गंभीर दखल घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. तसेच परिपत्रकात दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन म्हणाले.