एमआयडीसीकडून १४ भूखंडांची विक्री, ऑनर्लान प्रक्रियेचा फायदा
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या नवी मुंबई विभागाला (एमआयडीसी) भूखंड विक्रीतून मार्च ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ११९ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एमआयडीसीने नवी मुंबईतील १४ भूखंड विक्री केले आहेत.
नवी मुंर्बइत एमआयडीसीच्या मोकळ्या असणाऱ्या भूखंडावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करण्यात येते. त्यामुळे एमआयडीसीची डोकेदुखी वाढली होते. पण आता एमआयडीसीने भूखंडावर अतिक्रमण होऊ नये यासाठी भूखंड विक्री करण्यास सुरुवात केली आहे. एमआयडीसीने सन २०१७ मध्ये ई-बिडिंग सुरू केल्यामुळे एमआयडीसीचे भूखंड घेण्यासाठी राज्यातून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. एमआयडीसीने एप्रिल ते डिसेंबर २०१७ या कालावधीत १४ भूखंड औद्योगिक कारणासाठी विक्री केले असून त्यांतून ११९ करोड ४४ लाख ४३ हजार ५२५ रुपये इतका महसूल प्राप्त झाला आहे. नवी मुंबईतील भूखंड विक्रीतून एमआयडीसीचे भूखंड घेण्यासाठी पूर्वी कागदपत्रांच्या माध्यामातून निविदा काढण्यात येत होत्या. यातील किचकट प्रक्रिया पूर्ण करण्यात प्रशासनाचा वेळ वाया जात होता. अनेकदा स्थानिक रहिवाश्यांकडून निविदा भरणाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत असे. मात्र आता ई-बिडिंग सुरू झाल्यामुळे राज्यातील उद्योजक हे भूखंड विकत घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत आहेत. त्यामुळे एमआयडीसीच्या भूखंडासाठी मागणी वाढली असल्याचे एमआयडीसीचे क्षेत्र व्यस्थापक योगेश कांबळे यांनी सांगितले. ई-बिडिंगमुळ कामातही पारदर्शकता आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.