झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण; इंग्लिश शिकवणी वर्ग आणि महिलांना शिलाई शिक्षण
पोलीस ठाण्याचे आवार म्हटले म्हणजे विविध प्रकारचे गुन्हेगार, आरडाओरडा, जप्त केलेल्या गाडय़ा, आरोपींच्या नातेवाईकांची वर्दळ, पोलिसांच्या ‘भ’ अद्याक्षरावरून कानावर पडणाऱ्या शिव्या, कोठडीच्या कोपऱ्यात बसलेले भामटे चोर, तक्रार नोंदवून घेणारे ठाणे अंमलदार, एखाद्या तक्रारदाराचे आकांडतांडव असे काहीसे दृश्य पाहण्यास मिळत असते, मात्र रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात बांधण्यात आलेल्या इमारतीच्या तीन खोल्यांमधून शिलाई मशिनची टकटक, संगणकाचा प्रकाश आणि इंग्लिश शब्द कानावर पडत आहेत. या पोलीस ठाण्याने सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंर्तगत दोन कंपन्यांकडून आर्थिक निधी उपलब्ध करून झोपडपट्टी भागातील तरुण, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी हे उपक्रम सुरू केले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात एखाद्या पोलीस ठाण्यात रोजगाराभिमुख वर्ग सुरू करण्यात आलेले बहुधा हे पहिलेच पोलीस ठाणे आहे.
माजी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद पोलीस ठाणी टकाटक ठेवण्याबाबत फार आग्रही होते. असे म्हणतात कोणत्याही वास्तूची स्वच्छता ही तेथील शौचालयावरून समजते. प्रसाद थेट पोलीस ठाण्याच्या शौचालयांना भेट देऊन पाहणी करीत होते. सर्व पोलीस ठाणे नूतनीकरण मोहिमेत रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्याने एक वेगळा आदर्श समाजापुढे घालून दिला आहे. हे पोलीस ठाणे स्वच्छतेबाबत आघाडीवर आहेच, पण समाजसेवेची आवड असल्याने सवड काढून येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी पोलीस ठाण्यात सरस्वतीचा वावर सुरू केला आहे.
देशमुख यांनी आकोल्यातदेखील अशाच प्रकारे स्पोर्ट्स अॅकाडेमी, वाचनालय सुरू केले होते. एमआयडीसीसारखा औद्योगिक भाग या ठाण्याच्या अधिपत्याखाली येत आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पाच कोटीपेक्षा जास्त नफा कमविणाऱ्या कंपन्यांना सीएसआर बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे अशा अनेक कंपन्या मदतीचा हात देण्यास तयार असून देशमुख यांनी एल अॅन्ड टी इन्फोटेक व डायस्टार यासारख्या अद्ययावत कंपन्यांच्या व्यवस्थापनांच्या मागे लागून पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेल्या जागेचा सामाजिक कार्यासाठी वापर करून घेतला आहे.
या दोन कंपन्यांनी सीएसआर अंर्तगत पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या तीन खोल्यांमध्ये संगणक प्रशिक्षण वर्ग, शिलाई प्रशिक्षण, आणि जगाची भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लिशची गरीब गरजू विद्यार्थ्यांना देखील ओळख व्हावी म्हणून इंग्लिश शिकवणी सुरू केली आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून या ठिकाणी प्रशिक्षण झालेल्या महिला, तरुणांना एमआयडीसी भागात उपलब्ध ठिकाणी नोकऱ्याही दिल्या जात आहेत.
शिलाईचे प्रशिक्षण येणाऱ्या माहिलांना रबाले एमआयडीसीतील ए अॅन्ड डी डिझायनर कंपनीत नोकरी देण्याची हमी देण्यात आली आहे, तर संगणकाचे जुजबी ज्ञान उपलब्ध झाल्यानंतरही एल अॅन्ड टी इन्फोटेकमध्ये तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.
संगणक आणि शिलाईचे सहा महिने प्रशिक्षण आणि त्यांच्या बारा बॅचेस दिवसभरात घेतल्या जात आहेत. झोपडपट्टीतील महिला दुपारच्या वेळी काम आटपल्यानंतर मोठय़ा आवडीने शिक्षण घेत असून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा आनंद घेत आहेत, तर झोपडपट्टीतील मुले इंग्लिश म्हटल्यावर चार हात लांब पळत असतात, पण या ठिकाणी आता एका बॅचला ३० ते ४० मुले मोठय़ा आवडीने येत असून, दिवसभरात तीन बॅचेस घेतल्या जात आहेत.
तीनही प्रशिक्षण घेण्यासाठी समोरच्या नागरी वसाहतीत पाच ते सहा हजार रुपये महिन्याला खर्च करावे लागले असते, पण या ठिकाणी हे सर्व मोफत उपलब्ध होत असून या वर्गाची आवड असणारी पोलिसांची मुलेदेखील याचा लाभ घेत आहेत.
यासाठी लागणारे शिक्षक, संगणक, मशीन, फर्निचर यांचा सर्व खर्च या दोन कंपन्यांनी केला असून, त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी नुकतीच या उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.
खाकी गणवेशातील ‘समाजसेवा’
माजी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद पोलीस ठाणी टकाटक ठेवण्याबाबत फार आग्रही होते.
Written by विकास महाडिक
First published on: 25-03-2016 at 01:18 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Midc police station running computer training english tuition and women stitching course