उरण तालुक्याची लोकसंख्या जवळपास दोन लाख असून येथील ३५ ग्रामपंचायती व उरण शहराला तसेच केंद्र व राज्य सरकारच्या औद्योगिक प्रकल्पांना दोन धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीचे रानसई व जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाचे पुनाडे अशी ही दोन धरणे आहेत. यापैकी रानसई धरणाची साठवणूक क्षमता १० दशलक्ष घनमीटर असून पुनाडे धरणाच्या गळतीच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी दहा गावांना दिले जाते. या दोन्ही धरणांतील पाणी सारखे घटत असून रानसई धरणातील गाळ काढण्याचा व धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव तसेच पुनाडे धरणाच्या गळतीचे प्रमाण कमी करून पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. या पाश्र्वभूमीवर तालुक्यात दोन धरणे असूनही नवी मुंबईच्या धरणातून दररोज १० हजार क्युबीक मीटर पाणी उसने घेण्याची वेळ एमआयडीसीवर आली आहे.
ओएनजीसी, नौदलाचे शस्त्रागार, जेएनपीटी बंदर, वायू विद्युत केंद्र तसेच भारत पेट्रोलियमचे गॅस भरणा संयंत्र या केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पांमुळे उरण हा औद्योगिक तालुका गणला जात आहे. या प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठीच एमआयडीसीने ४५ वर्षांपूर्वी रानसई धरण बांधले. या धरणातील ६५ टक्के पाणी हे प्रकल्पांना तर ३५ टक्के पाणी २५ ग्रामपंचायती व नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरवले जाते. तालुक्यात सरासरी ३ हजार मिलीमीटर पाऊस पडतो. यापैकी यावर्षी केवळ ८५० मिलीमिटरच पाऊस झाला आहे. त्यामुळे रानसई धरणही कोरडे आहे, तर पुनाडे धरणात पाणी असूनही त्याच्या गळतीचे प्रमाण वाढलेले आहे. उरणमधील प्रत्येक कुटुंबाला दररोज सरासरी ३०० ते ४०० लिटर पाणी लागते, यासाठी दोन्ही धरणांतील पाणीसाठय़ाच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज आहे. यापैकी रानसई धरणात गेल्या ४० वर्षांपासून असलेल्या गाळामुळे तीन दशलक्ष घनमीटरपेक्षा पाणी कमी झाले आहे. हा गाळ काढण्यासाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. तर धरणाची उंची वाढविण्यासाठी आदिवासींच्या जमिनी संपादनाचा प्रश्न १५ वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. दहा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणातील पाणी गळती कमी करून त्याचा वापर करण्याची मागणीही कायम आहे. दुसरीकडे २५ ते ३० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांतून होणाऱ्या गळतीमुळे २ ते ३ टक्के पाणी वाया जात आहे. अनेक ठिकाणी उरणमधील पाणी माफियांकडून जलवाहिन्यांना भोके पाडून दररोज लाखो लिटर पाण्याची चोरीही केली जात आहे.
यामुळे या दोन्ही धरणांची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Midc take water from navi mumbai dam for uran poeple
Show comments