पनवेल पालिकेतील अवघ्या ११ उमेदवारांची संपत्ती लाखापेक्षा कमी

पनवेल महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्यांपैकी बहुतेक उमेदवार हे लक्षाधीश आहेत. अवघ्या ११ उमेदवरांची संपत्ती एक लाखापेक्षा कमी आहे. निवडणूक म्हणजे वारेमाप खर्च असे समीकरण असल्यामुळे या आर्थिकदृष्टय़ा फारशा सक्षम नसलेल्या उमेदवारांना बडय़ा उमेदवारांशी दोन हात करताना बरीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.

श्रीमंत उमेदवार स्वत:चा प्रचार करण्यासाठी प्रत्येक प्रभागात एलईडीवर चित्रफीत दाखवून, कार्यकर्त्यांची फौज उभी करून आणि प्रत्येक कार्यकर्त्यांची उत्तम बडदास्त ठेवून ‘मीच तुमचा विकास करू शकतो’, हे बिंबविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ज्यांची संपत्ती लाखांच्या घरात नाही, असे उमेदवार आपली लोकसेवेची इच्छा आणि क्षमता मतदारांसमोर मांडण्याची धडपड करत आहेत.

ओवे येथील प्रभाग क्रमांक ३ मधील काँग्रेसच्या उमेदवार मंजुळा कातकरी यांची संपत्ती सहा हजार रुपये आहे. प्रभाग ४ मधील भारीप बहुजन महासंघाच्या पदवीधर असलेल्या सुनिता सोनावणे (२४) यांची संपत्ती अवघी ११ हजार रुपये आहे. रोडपाली येथील प्रभाग ७ कळंबोली येथील ५१ वर्षांच्या अपक्ष उमेदवार सरोज मेनन यांची संपत्ती ४५ हजार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कळंबोली येथील प्रभाग ८ मधील यासीन अज्जू खान हा २६ वर्षीय पदवीधर तरुण बेरोजगार असून त्यांची संपत्ती ११ हजार रुपये आहे. निवडून आल्यानंतर कळंबोली स्वच्छ व सुंदर करणार असल्याचा दावा यासिन यांनी केला आहे.

अपंगांसाठी काम करणारे अपक्ष उमेदवार महादेव रामचंद्र पवार प्रभाग ८ मधूनच निवडणूक लढवत असून पवार यांची संपत्ती १ हजार ९०० रुपये आहे. १२वी उत्तीर्ण मारुती गुरव यांची संपत्ती १ हजार रुपये आहे. प्रभाग ९मधील निर्मला बापू पवल या नववी उत्तीर्ण असून त्यांची संपत्ती २० हजार रुपये आहे. २१ वर्षीय इफ्तीसम राजूभाई मुल्लानी पदवीधर बेरोजगार आहेत. त्यांची संपत्ती साडेपाच हजार रुपये आहे.

प्रभाग ११ मधील ४० वर्षांच्या विमल कार्डे या दहावी उत्तीर्ण असून त्यांची संपत्ती अडीच हजार रुपये आहे. प्रभाग १२ मधील २३ वर्षांचा सनी मोहिते बेरोजगार आहे. त्याची संपत्ती २१ हजार रुपये आहे. तसेच याच प्रभागामध्ये भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे जगदीश गायकवाड यांची संपत्ती २ कोटी ५७ लाख २६ हजार एवढी आहे, त्यांचे प्रतिस्पर्धी शेकापचे सचिन गायकवाड यांनी २ लाख ११ हजार एवढी संपत्ती घोषित केली आहे. प्रभाग १५मध्ये महादेव वाघमारे यांची संपत्ती १ लाख ५ हजार असल्याचे नोंदविण्यात आले आहे. याच प्रभागामधील ३७ वर्षीय अविनाश गोविंद गमरे यांची संपत्ती ० आहे. तसेच त्यांच्यावर दीड लाख रुपये कर्ज आहे. नववी शिक्षण व व्यवसाय करणारे ३६ वर्षीय प्रसाद सदाशिव परब यांची संपत्ती ११ हजार ५०० रुपये आहे. याच प्रभागातून निवडणूक लढवणारे पदवीधर अनिकेत भंडारे (२५) यांची संपत्ती २० हजार ५०० आहे.

नवीन पनवेल येथील मीना सुरेश गायकवाड यांची संपत्ती २० हजार तर राष्ट्रवादी काँग्रेसची २१ वर्षीय उमेदवार शिवानी सुनील घरत हिची संपत्ती १२ हजार ५०० रुपये आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये चालकाचे कंत्राटी काम करणाऱ्या पनवेल येथील कापडगल्ली परिसरात राहणाऱ्या सचिन पडाळकर यांची संपत्ती ७ हजार रुपये आहे. महिन्याला १२ हजार रुपये वेतन कमवणारे सचिन हे तरुणांचे समुपदेशन करतात. याच परिसरातील जयसिंग शेरे या पदवीधर उमेदवाराची संपत्ती ३५ हजार आहे. प्रभाग १९ मध्ये पालिकेच्या निवडणुकीमधील सर्वात श्रीमंत उमेदवार परेश ठाकूर हे निवडणूक लढवत आहेत. त्याच प्रभागामध्ये सचिनसारखे अल्प उत्पन्न गटातील उमेदवार िरगणात आहेत. २३ वर्षीय प्रतिभा बाळ चव्हाण या वकील असून प्रभाग १३ व १५मधून चव्हाण निवडणूक लढवत आहेत. तसेच ४३ वर्षीय पदवीधर उमेदवार मानवेंद्र वैदू हे प्रभाग १६ व १७ मधून निवडणूक लढवत आहेत.

कोटय़धीश उमेदवार

  • परेश ठाकूर – ९५ कोटी
  • किशोर म्हात्रे – ३७ कोटी
  • रामदास शेवाळे – २९ कोटी
  • रामजी बेरा – २७ कोटी ३९ लाख
  • प्रीतम म्हात्रे – २६ कोटी
  • विनोद पटेल – २४ कोटी
  • अजय कांडपिळे – २२ कोटी
  • राजेंद्र शर्मा – २१ कोटी ९५ लाख
  • चंद्रकांत सोनी – १४ कोटी
  • मोहन गायकवाड – १३ कोटी
  • रवींद्र जोशी – १३ कोटी
  • राजेश्री वावेकर – १२ कोटी
  • अरविंद म्हात्रे – ११ कोटी
  • अजिज पटेल – ११ कोटी
  • संदीप पाटील – १० कोटी
  • लीना गरड – ९ कोटी ८१ लाख

Story img Loader