मिनी सीशोर (जुई चौपटी) वाशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्य चिंतेचे कारण असू नये, असे ज्यांनी ठरवले आहे ते रोज चालण्या- धावण्याचा वसा घेतात. रोजच्या धावत्या आणि चालत्या पावलांसाठी अशा काही जागा विस्ताराने आखण्यात आल्या आहेत. की त्याचे नाव मिनी असले तरी तेथील उत्साही वातावरणात सुदृढ आरोग्याची संकल्पना मॅक्झिमम होते. अधिक विस्तारते. वाशी येथील जुई चौपाटीवर खुली व्यायामशाळा, योग, सामुहिक व्यायाम, हास्यक्लब अशा विविध कृतींमधून ती खुलत जाते.  खूपसा निवांतपणा, डेरेदार वृक्षांनी वेढलेला परिसर समोर पाण्याचा अवकाश, अशी या जागेची सुंदर रचना. शहरातील खुल्या जागेतील हा तंदुरुस्तीचा हा अवकाश मोठा आहे..

मिनी सीशोरवर मन एकाग्र होण्यास वेळ लागत नाही. यात आपोआप एक तंद्री लागते. वाशीतील ‘होल्डिंग पॉण्ड’ला नवी मुंबईच्या जन्मापासून मिनी सीशोर असे नाव पडले. दुसरं नाव जुई चौपटी. या परिसराला विस्तीर्ण खाडीकिनारा आहे. तिन्ही काळ म्हणजे तीनही ऋतूत या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी थंडावा शोधण्यासाठी इथे निसर्गप्रेमी येत असतात. मुंबई वा नवी मुंबईत कधी इतक्या जोरदार न वाहणाऱ्या थंडीचा प्रहर सध्या सुरू आहे. त्यामुळे बोचरे वारे अंगावर घेत  अडीच किलोमीटरची रपेट अनेक जण या चौपाटीवर मारतात. तलावाभोवती जॉगिंग ट्रॅॅक आहे. पहाटे ४ वाजता या ट्रॅकवर पावलांची लगबग सुरू होते. थोडय़ा वेळाने इथे वर्दळीचा समय सुरू होतो. सोबतीला सुरेल संगीत आणि सुखद वारा अशी मेजवानी घेत अनेक जण सुदृढ आरोग्यासाठी येथे येतात.

शुभप्रभात वा गुड मॉर्निग अशी सुरुवात करूनच पुढचं पाऊल टाकलं जातं.  काही जण एकेकटे आणि काही जण गटागटाने ‘सीशोर’च्या तटी येतात. येथे अभिवादनाची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. ‘वॉक’साठी येणाऱ्याला बोलतं करणं हा त्यामागचा उद्देश. आता काही जण या ठिकाणी ‘अबोल’ म्हणूनच येतात. म्हणजे व्यायाम करताना बोलायचे नाही, हा त्यामागचा उद्देश. कारण न बोलता चालणं म्हणजे चालताना निर्माण झालेली ऊर्जा शरीरात तशीच कायम टिकवून ठेवण्याची कला,

अशी काहींची रीत आहे. तर काही जण बोललंच नाहीतर जमणार कसे? बोलण्यासाठीच तर आपण जन्माला आलोय, अशी पुस्ती जोडतात.

पक्ष्यांचे थवे आकाशात भरारी घेत आहेत आणि आपण त्यांना इथे जमिनीवर बोलवावे, असा अनेकांचा मनसुबा असतो. तो काही प्रमाणात यशस्वीही ठरतो. येताना हातात चण्याफुटाण्यांची वा कुरमुऱ्यांची पिशवी वा तत्सम खाद्य अनेकांच्या हाती असते. पक्ष्यांवर एक नजर टाकायची आणि त्याच्या रोखाने दाणे फेकायचे की झाले. खाद्याच्या शोधार्थ असलेले मुक्त विहंग थेट खाली झेपावतात आणि मग दाणे देणाऱ्यांची आणि ते टिपणाऱ्यांची एक दोस्ती जम धरू लागते आणि जोमावतेसुद्धा. थरथरणारी पावलं चिमुकल्या पावलांच्या साथीनं सायंकाळी इथे हटकून हजेरी लावतात. आजी वा आजोबा किंवा मग दोघेही नातवाला घेऊन फेरफटका मारण्यासाठी येतात. चार भिंतीत तासन्तास बसून कंटाळा येतो, त्या भिंतींमध्ये लहानग्यांच्या पावलांना पुरेशी जागा हवी, यासाठी वाशीतील ‘सीशोर’ आमच्यासाठी वरदानच आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक देतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपार गलकाही येथे होतो. काही नामवंतांची येथे हजेरी असते. त्यांनी ‘वॉक’चा बराचसा अनुभव गाठीशी घेऊन आरोग्य कमावलेलं असतं. त्यामुळे काही नवख्यांना वा आरोग्याची काळजी घेण्यात काहीसे गोंधळलेल्यांना हे नामवंत मार्गदर्शन करतात. या अशा नवख्या आणि अनुभवींची एक समूह चाल येथे हळूहळू गती घेते. कुटुंबाची सोबतही इथे अनेकांना मिळते.

वनराईत भर घालत असलेली कांदळवने आणि खाडीकिनारीचे पाणी अशी येथे सोबत आहे. वाशी, घणसोली, कोपरखरणे, तुभ्रे आणि सानपाडा येथून नागरिक येतात. पावसाळयात काही ठिकाणी भरघोस झाडे वाढली की नागरिकांना ‘वॉक’ पूर्ण करता येत नाही, अशी मध्यंतरी तक्रार होती. म्हणजे अडीच किलोमीटरच्या चौपाटीला अर्धवट वळसा घेऊन परतावं लागतंय, असं काहींचं म्हणणं होतं; पण पावसाळ्यानंतर ही समस्या दूर करण्यात आली आणि आता तर येथील प्रत्येक जण सुसाट असतो. येथे खुल्या व्यायामशाळेचा फायदाही काही जण घेतात. येथील जॉगिंग ट्रॅकवर जाण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. या दोन्ही ठिकाणी कडुलिंब, आवळा, कार्ले, तुळस, आले, गहू आदी पदार्थाचे रस घेऊन विक्रेते बसलेले असतात. उन्हाळा वा हिवाळ्यात रसांना साहजिकच मोठी मागणी असते.

नऊ वर्षांपासून मी या ठिकाणी चालण्याचा व्यायाम करीत आहे. दिवसा चालणं असलं तरी ते शिस्तबद्ध नसतं. इथे दिवसाच्या सुरुवातीला ती शिस्त लागते.

पीयूष पटेल

मधुमेहाचा त्रास जरी असला तरी व्यायामाने त्यावर मी बऱ्यापैकी मात केली आहे. वजन घटविण्याच्या कामातही मला व्यायामाचा मोठा हातभार लागला आहे.

चंद्रकांत जाधव

वयाच्या ६६व्या वर्षीही आरोग्य ठणठणीत ठेवण्यात मी यशस्वी ठरलो आहे. कोणतेही अन्न पचविण्यात काही त्रास जाणवत नाही. निरोगी जीवनाची गुरुकिल्ली सीशोरवरील दोन तासांच्या घाम गाळण्याच्या कृतीतून मिळाली आहे.

राजेंद्र निंबाळकर

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mini seashore juhu chowpatty vashi
Show comments