वाहनताफ्यातील चालकांकडूनच नियम पायदळी; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मात्र इन्कार
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघातांच्या मालिका रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, अपघात रोखण्यात प्रशासन नेमके कुठे कमी पडते आहे, वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करता येईल या बाबींची पाहणी करण्यासाठी द्रुतगती मार्गावर आलेल्या मंत्रीद्वयांच्या वाहनताफ्यातील चालकांनीच वेगमर्यादा ओलांडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले.
द्रुतगती मार्गावर भरधाव वेगाना धावणाऱ्या गाडय़ांना वेगमर्यादेचे पालन करण्याचा सल्ला देण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय उपायोजना आखता येतील, त्यांची अंमलबजावणी कशी करता येईल, याची पाहणी करण्यासाठी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी दुपारी द्रुतगती मार्गावर आले होते. त्यांच्यादेखत गुरुवारी १२६ वाहने आणि २० अवजड वाहनांवर नियमभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. मात्र, खुद्द मंत्रिमहोदयांच्या ताफ्यातील गाडय़ांचाच वेग ताशी ८० किमी प्रतितासाच्या वर होता, असे निदर्शनास आले. मंत्रिद्वयांच्या दौऱ्यादरम्यान पुण्याच्या दिशेने परिवहन विभाग, महामार्ग पोलीस आणि वाहन निरीक्षक येथे महामार्गाच्या काही किलोमीटरच्या अंतरावर तैनात करण्यात आले होते. सुरुवातीला लोधिवली पुलाखाली मंत्रिद्वय पोलीस कसे कारवाई करतात ते पाहण्यासाठी थांबले. महामार्गात कोणालाही थांबण्याचा अधिकार नसला तरीही तेथे मंत्र्यांचा ताफा थांबल्याने तिसरी रांग अडविण्यात आली. त्यानंतर तेथे मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना पाऊण तास मुलाखती दिल्या. त्यानंतर त्यांनी तळेगाव टोलनाका गाठला. तळेगाव टोलनाक्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी महामार्गावर चाललेल्या एका विना नंबरच्या एका ट्रकला पकडले होते. ते ही मंत्र्यांनी दाखवले. अशा प्रकारे वेगाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि वेगात मार्गिका बदलणाऱ्या वाहनचालकांवर यापुढे कठोर कारवाई करणार असल्याचे मंत्र्यांनी बजावले. दौऱ्यात टोलनाक्यावर मंत्र्यांसह इतर वाहनांच्या ताफ्याला टोल न घेता सोडण्यात आले.
ताफ्यातील वाहनचालकांनी द्रुतगती मार्गावर कुठेही वेगमर्यादेचे उल्लंघन केले नाही. वेगमर्यादेचे पालन करूनच गाडय़ा द्रुतगती मार्गावरून जात होत्या.
– एकनाथ शिंदे,
सार्वजनिक बांधकाममंत्री

Story img Loader