अलिबाग : नातेसंबधातील ताण तणाव, प्रेम संबध, पालकांबाबत नाराजी यातून रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुला मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात मुले बेपत्ता होण्यासंदर्भातील १२१ गुन्हे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, मुलांच्या तुलनेत मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे, पालकांकडून आपल्या पाल्यांचे विशेषतः पौगंडावस्थेत असलेल्या मुलींचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अल्पवयीन मुलं आणि मुली हरविल्याच्या १२१ तक्रारी दाखल झाल्या होता. यात ४२ मुले आणि ८९ मुलींचा समावेश होता. म्हणजेच मुलांच्या तुलनेत घर सोडून पळून जाणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त होते. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागांत मुले मुली पळून जाण्याचे प्रमाण अधिक होते. यात कर्जत, नेरळ, खालापूर, खोपोली, रसायनी, अलिबाग, पेण, माणगाव, रोहा यासारख्या शहरी भागांत मुले मुली पळून जाण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. तर श्रीवर्धन, महाड, म्हसळा, पोयनाड, मरूड सारख्या तालुक्यात हे प्रमाण कमी होते. माथेरान आणि तळा येथे वर्षभरात अल्पवयीन मुलं पळून जाण्याची एकही घटना घडली नाही. यावरून शहरी भागांत मुलामुलींचे पळून जाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट दिसून येते.

हेही वाचा – उरणच्या वायू विद्युत केंद्रातील ५० मेगावॅट निर्मिती संच बंद, १०० टक्के कामगार संपात सहभागी

पोलीसांनी तपास करून दाखल झालेल्या १२१ गुन्ह्यांमधील ८३ मुली आणि ३९ मुलांचा शोध लावला. त्यांना आपल्या पालकांच्या ताब्यात दिले. मात्र अद्यापही ६ मुली आणि ३ मुलांचा शोध लागलेला नाही. त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस तपासात यातील बहुतांश गुन्ह्यांना प्रेमसंबधांची किनार असल्याचे समोर आले आहे. तर काही प्रकरणांत पालकांबद्दल मुलांच्या मनात असलेला राग, नातेसंबधातील ताणतणावही कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, या गुन्ह्यांकडे आणि पळून जाणाऱ्या मुलांमुलींकडे संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ञ व्यक्त करतात.

पालकांनी अशा मुलामुलींची मानसिकता समजून घ्यायला हवी, त्यांच्यावर चांगले संस्कार करायला हवे. व्यक्ती स्वातंत्र्य, सैराचार यातील फरक मुलांना लक्षात आणून द्यायला हवा. कौटुंबिक जाबबदारीची वेळोवेळी जाणिव करून द्यायला हवी, मुलाशी सतत संवाद ठेवायला हवा. जीवन जगण्याचे कसब त्यांना आत्मसात करून द्यायला हवे. शाळेत आणि महाविद्यालयीन मुलांचे मानसिक समुपदेशन करायला हवे. गरज भासल्यास त्यासाठी पालकांनी मानसोपचार तज्ञांची, पोलीसांच्या भरोसा सेलची मदत घ्यायला हवी.

हेही वाचा – रायगड : वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा फटका उद्योग क्षेत्राला

पौगंडावस्थेत मुलांच्या शरीरात बदल होत असतात. एकतर्फी विचार करण्याचे प्रमाण वाढते. समाजमाध्यमे आणि माध्यमांवर दिसणाऱ्या घटनांचा या पौगंडावस्थेती मुलांमुलींच्या मनावर परिणाम होत असतो. काही वेळेला घरातील परिस्थिती कारणीभूत असते, त्यामुळे पौगंडावस्थेतील मुलांमुलींवर पालकांनी जास्त लक्ष देण्याची गरज असते, असे मनसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी सांगितले.

Story img Loader