मोड आलेली मटकी, वाटाण्याची उसळ, झणझणीत कट असलेला रस्सा, बेसनाची पापडी आणि शेव. वर पेरलेली कोशिंबीर, कांदा आणि लिंबाची फोड. अस्सल कोल्हापुरी मिसळीची झणझणीत मिसळ चाखायची असेल, तर ऐरोलीतल्या ‘मिसळ एक्स्प्रेस’ला भेट द्यायलाच हवी.
मिसळ एक्स्प्रेस हे प्रथमेश पाटसकर यांनी सुरू केलेले एक छोटेखानी स्नॅक्स कॉर्नर. मूळचे अहमदनगर असणारे प्रथमेश पाटसकर यांनी हॉटेल मॅनजेमेंटचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्राचा लोकप्रिय पदार्थ म्हणजेच मिसळ खवय्यांना पेश करण्याचा निर्णय घेतला आणि मिसळ एक्स्प्रेसचा प्रवास सुरू झाला. मिसळ एक्स्प्रेस सकाळी ८.३० पासूनच धावू लागते. मिसळ हे जरी या एक्स्प्रेसचं इंजिन असलं, तरी त्याला इतरही खाद्यपदार्थाचे डबे जोडण्यात आले आहेत. दही मिसळ पाव, पुरी भाजी, साधा डोसा, उपमा, पोहे, उत्तपा, मसाला उत्तपा, आलू पराठा, गोबी पराठा, चपाती भाजी, मुगडाळ खिचडी, दही भात असे पदार्थही इथे मिळतात.
कोल्हापुरी मिसळ इथे सर्वाधिक गर्दी खेचते. पाटसकर यांच्या वहिनी कोल्हापूरच्या आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार कोल्हापुरी मिसळ बनवण्यास सुरुवात केली आणि ही मिसळ सर्वाधिक लोकप्रिय झाली. आठवडय़ाला सुमारे दोन ते अडीच किलो मटकी व वाटाण्यांची उसळ बनवली जाते. मिसळीच्या रश्श्याला अस्सल कोल्हापुरी चव यावी, म्हणून खास कोल्हापूरहून मसाला मागवला जातो. यासाठी दोन प्रशिक्षित स्वयंपाकी ठेवण्यात आले आहेत. रश्श्यासाठी टोमॅटो, खोबरे, आले-लसूण मोठय़ा प्रमाणात वापरले जाते. ऑर्डर देताच पदार्थ झटपट मिळतो.
मिसळीसाठी वापरले जाणारे फरसाण हे चांगल्याच दर्जाचे असेल, याची काळजी घेतली जाते. हे फरसाण ठाण्यावरून मागवण्यात येते. या परिसरात मराठी लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे आणि मिसळ एक्स्प्रेसमध्ये अस्सल मराठमोळी चव जपली जात असल्याने ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. या परिसरात मोठय़ा प्रमाणात शाळा-महाविद्यालये आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचीही येथे गर्दी असते.
मिसळ एक्स्प्रेस
कुठे?- सुंदरम बिल्डिंग, शॉप नं-६,
सेक्टर-३, ऐरोली, नवी मुंबई</p>
कधी?- सकाळी ८.३० ते रात्री १०वा.