नवी मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणावर आयुक्त डाॅ.कैलास शिंदे यांनी भर दिला आहे. योग्य व अचूक निदानाकरिता महापालिकेच्या रुग्णालयात २४ तास एमआरआय सुविधा बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासह इतरही अनेक सुविधांवर या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील क्ष-किरण विभागात ‘क्ष-किरण तपासणी’ व ‘सीटी स्कॅन’ सुविधा रुग्ण तपास, निदान करण्यासाठी वापरल्या जातात. रुग्णांना अधिक प्रभावी तपासणीकरिता तसेच अत्यवस्थ रुग्णांकरिता अचूक, योग्य निदानाकरिता एमआरआय सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत ही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी सेंटरमध्ये जाऊन एमआरआय सुविधा उपलब्ध करुन घ्यावी लागते. ही सेवा काहीशी महागडी असल्याने रुग्ण त्या चाचणीस दिरंगाई करतात. त्यामुळे योग्य व अचूक निदानाकरिता महापालिकेच्या रुग्णालयात २४ तास एमआरआय सुविधा बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

कर्करोग, डायलिसीससाठी विशेष कक्ष

केमोथेरपी : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना केमोथेरपी उपचार सुविधा उपलब्ध करून देणेकरिता महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय, नेरूळ या ठिकाणी १० बेडचे ‘डे केअर केमोथेरपी युनिट’ सुरू करण्यात आलेले आहे. या व्यवस्थेचा विस्तार करता येईल का यासंबंधी चाचपणी केली जात आहे. ऐरोली तसेच नेरुळ या ठिकाणी बाहययंत्रणेव्दारे डायलिसीस सुविधा कार्यरत आहे. वाढती डायलिसीस रुग्णसंख्या विचारात घेता महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये(१) स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन, से.१४ वाशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, से.०८, सी.बी.डी.अशा दोन ठिकाणी बाहययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर डायलिसीस सुविधा सुरु करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून सन २०२५-२६ मध्ये साधारणत: ६५५२ रुग्णांना डायलिसीस सुविधेचा लाभ घेता येईल.

कॅथलॅब व आय.सी.यू विभाग कार्यान्वित करणे

नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयामध्ये ह्रदयविकाराच्या रुग्णांवरील उपचाराकरिता सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली येथे बाहययंत्रणेव्दारे कॅथलॅब व आय.सी.यू. विभाग कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे. सदर कॅथलॅब आय.सी.यू. सुरू केल्यास ह्रदयविकार आलेल्या रुग्णांची Angiography करुन त्यांना पुढील उपचार सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल.

पोषण पुनर्वसन केंद्र :

पोषण पुनर्वसन केंद्र हे आरोग्य सुविधेतील एक युनिट आहे जिथे गंभीर तीव्र कुपोषण असलेल्या मुलांना दाखल केले जाते आणि त्यांचे व्यवस्थापन केले जाते. कुपोषणासारख्या समस्येवर मात करण्यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रात माता बाल रुग्णालय, तुर्भे येथे तीव्र कुपोषित बालकांचे उपचार तथा बालमृत्यू कमी करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र :

नवी मुंबई महानगरपालिका सार्व. रुग्णालय, वाशी याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांकरीता ५ रुग्णखाटा राखीव असलेला स्वतंत्र Geriatric Ward स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार, औषधे, चाचण्या, Physiotherapy इत्यादी सुविधा देण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर महानगरपालिका सार्व. रुग्णालय, नेरूळ व ऐरोली येथे असे कक्ष स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.

नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर वैद्यकीय संस्था :

सार्वजनिक रुग्णालय वाशी, नेरुळ व ऐरोली तसेच माता बाल रुग्णालय बेलापूर, तुर्भे आणि सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे येथील उपलब्ध सेवा – सुविधा व उपचारार्थ येणा-या रुग्णांची संख्या त्याचप्रमाणे आवश्यक चाचण्या इ. आकडेवारीचा संकलित अभ्यास केला असता, नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांची संख्या लक्षात घेता तज्ज्ञ डॅाक्टरांची आवश्यकता भासत असल्याने पदव्युत्तर वैद्यकीय संस्था सन २०२४-२५ मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. पीजी संस्थेत शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ साठी ५ विषयांसाठी अंदाजे २२ विद्यार्थांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तसेच प्रवेशित विद्यार्थांना विद्यावेतन देण्यात येईल. प्रवेशित झालेल्या पीजी डॅाक्टरांच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सुविधा अधिक सुलभतेने देण्यासाठी लाभ होईल. आगामी काळात आणखी ४ पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील.

आयुष रुग्णालय :

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रुग्णालयांमार्फत विविध रुग्णांना उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या उपचार सुविधांसह शहरातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयोजन आहे. शहरातील रुग्णांसह निरोगी नागरिकांचे आरोग्य स्वास्थ्य उत्तम रहावे याकरिता आयुर्वेदिक रुग्णांलयाची स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जागा उपलब्ध झाल्यानंतर नमूद केल्याप्रमाणे किमान २ आयुर्वेदिक रुग्णालय सुरू करणेबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

नर्सिंग कॉलेज :

महानगरपालिका कार्यक्षेत्रात नर्सींग कॉलेज सुरू करण्याचे प्रयोजन आहे. त्यामुळे महानगरपालिकेची रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यास व दर्जेदार रुग्णसेवा सुरू करण्यास मदत होईल. याकरिता महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जागा उपलब्ध झाल्यानंतर नमूद केल्याप्रमाणे नर्सिंग कॉलेज सुरू करणेबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

पशु वैद्यकीय दवाखाना :

पशूवैदयकीय दवाखाना उभारुन त्या रुग्णालयासाठी सिटी स्कॅन, सोनोग्राफी सुविधा पुरविण्यासाठी ठेकेदार नियुक्ती करण्याची प्रक्रिया कार्यप्रणालीत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आलेले पशू रुग्णालय चालविण्यासाठी पीपीपी तत्वावर नियुक्ती करण्याची प्रक्रिया कार्यप्रणालीत आहे.

Story img Loader