नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील दोन नेत्यांत सुरू असलेला वाद आता पालिकेच्या दारात पोहोचला आहे. येत्या शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असलेल्या उद्घाटन कार्यक्रमांवर आक्षेप घेत ‘अर्धवट कामांचे उद्घाटन कशाला’, असा संतप्त सवाल आमदार गणेश नाईक यांच्या समर्थकांनी पालिका आयुक्तांना केला. त्यावर पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनीही ‘लोकप्रतिनिधींनी पूर्ण माहिती घेऊनच बोलावे’ अशा शब्दांत त्यांना सुनावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या शुक्रवारी नवी मुंबईत येणार असून त्यांच्या हस्ते वाशी येथील महाराष्ट्र भवनाच्या भूमिपूजनासह सिडकोचा गोल्फकोर्स तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर लढाऊ विमानाच्या चाचणीसह शहरातील काही विकासकामांची उद्घाटने होणार आहेत. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून साकारलेल्या काही कामांचा यात समावेश असल्याचे समजते. निवडणुकीच्या तोंडावर होऊ घातलेल्या या कार्यक्रमामुळे भाजपमधील नाईक गटात अस्वस्थता असल्याचे समजते. हीच अस्वस्थता  मंगळवारी पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीतून समोर आली.

हेही वाचा >>>नवी मुंबईत महायुतीला धक्का; विजय नहाटांच्या हाती तुतारी ?

नवी मुंबई शहरातील पाण्याच्या प्रश्नावर आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान नाईक यांच्याबरोबर असलेल्या काही माजी नगरसेवकांनी उद्घाटनाचा मुद्दा मांडला. ही कामे अपूर्ण असतानाही उद्घाटनाचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर आयुक्त शिंदे यांनी त्यांना संतप्त प्रत्युत्तर दिले. ‘जी कामे पूर्ण झाली आहेत. त्यांचीच उद्घाटने होतील. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोप करताना माहिती घेऊन बोलावे,’ असे त्यांनी सुनावले. बैठकीस माजी खासदार संजीव नाईक, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण पूर्ण भरले असतानाही नवी मुंबईत पाणीटंचाई जाणवत असल्याबद्दल आमदार गणेश नाईक यांनी संताप व्यक्त केला. प्रशासकीय कालावधीमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे, की केली आहे, असा सवाल करत नाईक यांनी पाणीवितरणाची आकडेवारी देण्याची मागणी आयुक्तांकडे केली. ‘ मंत्रालयातून आदेश येणार आणि तुम्ही त्या आदेशानुसार तुम्ही मोरबेचे पाणी दुसरीकडे वळवणार असाल तर यापुढे याद राखा,’ असे सांगत नाईक यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मोरबे धरण परिसरातील बेकायदा बांधकामे हटवण्याच्या मागणीकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सिडको मनमानी पद्धतीने भूखंडांवरील आरक्षण हटवत असेल तर त्याला आम्ही विरोध करू, असा इशारा नाईक यांनी दिला.

हेही वाचा >>>नवी मुंबई विमानतळावर वायू दलाच्या लढाऊ विमानाची चाचणी लवकरच

स्वत:चे धरण असूनही नवी मुंबई तहानलेली आहे हे दुर्दैव आहे. पालिका अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा व वितरणाबाबत लेखी माहिती द्यावी. शहरात एक वेळाचे पाण्याचे शटडाऊन सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याला पालिका अधिकारी जबाबदार आहेत. – संदीप नाईक, माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष

पालिका प्रशासन हे नियमानुसार कारभार करते. परंतु अधिकारी हे कामात हलगर्जी करत असतील यापुढे हे चालणार नाही. पाण्याबाबतचा प्रश्न असो किंवा इतर कोणताही यापुढे प्रत्यक्षात साईटवर जाऊन पाहणी करुन अहवाल द्यावा. अन्यथा अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल .- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नमुंमपा

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla ganesh naik objected to the inauguration programs navi mumbai amy