गणेश दर्शन स्पर्धेच्या कार्यक्रमात राजकीय कलगी तुरा
लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकीनंतर नवी मुंबई महापौर सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभानिमित्ताने पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलेल्या पालिका सत्ताधारी व विरोधकांच्या राजकीय कलगी तुऱ्याचे दर्शन नवी मुंबईकरांना झाले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाषण करून न दिल्याने त्यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला आणि महापौर सुधाकर सोनावणे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग मांडण्याचा इशारा दिला. त्यामुळे समारंभाला मतभेदांचे गालबोट लागले.
गतवर्षीच्या नवी मुंबई महापौर गणेश दर्शन स्पर्धा २०१४ चा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी वाशी येथील भावे नाटय़गृहात पार पडला. त्यावेळी व्यासपीठावर पहिल्यांदाच सत्ताधारी राष्ट्रवादीचे सल्लागार माजी मंत्री गणेश नाईक, खासदार राजन विचारे, नाईक कट्टर विरोधक आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेता विजय चौगुले, आमदार संदीप नाईक उपस्थित होते. पारितोषिक वितरण सोहळ्यापूर्वी समारंभाला शुभेच्छा देणारी भाषणे झाली. त्यात सर्वप्रथम खासदार राजन विचारे यांनी भाषण केले. त्यानंतर ज्यांच्या मतदार संघात हा कार्यक्रम होत होता त्या मंदा म्हात्रे यांना भाषण करण्याची संधी देणे क्रमप्राप्त होते, पण त्यांचा तो हक्क पालिकेने हिरावून घेतला. त्यांच्या ऐवजी थेट महापौर सुधाकर सोनावणे यांना बोलण्यास आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी म्हात्रे यांचा संयम सुटला आणि त्यांनी व्यासपीठावरच आम्ही काय यांची भाषणे ऐकायला आलो आहोत, अशा शब्दात निषेध व्यक्त केला. त्यामुळे सभागृहात काही काळ वातावरण तंग झाले. महापौरांनंतर मुख्य अतिथी गणेश नाईक यांनी भाषण केले. त्यामुळे म्हात्रे यांनी महापौराना हक्कभंग आणण्याचा इशारा दिला. हा बहुजन समाजातील महिलेचा अपमान असल्याची प्रतिक्रिया म्हात्रे यांनी दिली तर हा अन्याय असल्याचे चौगुले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा