बेलापूरमधील बैठकीत ‘एनएमएमटी’वर दबाव; बस चालूच ठेवण्याचा अधिकाऱ्यांचा निर्धार
आमदार जनहितासाठी निवडून दिले जातात, या विधानातील ‘जनहित’ हा शब्द पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी खूपच संकुचित अर्थाने वापरण्याचा विडा उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच दिवसांत पाच हजार प्रवाशांची ने-आण करणाऱ्या ‘पनवेल-७६’ बसची कामगिरी तीन आसनी रिक्षाचालकांच्या डोळ्यांत खुपत आहे आणि रिक्षाचा धंदा बसणार हे ‘शल्य’ दूर करण्यासाठी चालकांनी ठाकूर यांनी ‘शस्त्रक्रिया’ करावी यासाठी त्यांच्या दारी धाव घेतली आहे. यावर नेहमीच्या ‘ठाकूरशैलीत’ आमदारांनी ‘पनवेल-७६’ बसची फेरी (वारंवारिता) एक तासांनी सुरू करण्यासाठी एनएमएमटीकडे तगादा लावल्याचे बोलले जात आहे.
करंजाडे परिसरातील प्रवाशांची पनवेल रेल्वेस्थानकापर्यंत ने-आण करणाऱ्या एनएमएमटीची ‘पनवेल-७६’ क्रमांकाच्या बसला सुरुवात होऊन पाच दिवस पूर्ण झाले आहेत. या बसला तीन आसनी रिक्षाचालकांनी विरोध केला आहे. या रिक्षाचालकांनी तासाने एक या वेळेनुसार ही बस चालवावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. या संतप्त रिक्षाचालकांचे नेतृत्व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ठाकूर यांनी पुढाकार घेऊन प्रादेशिक परिवहन विभाग, एनएमएमटी, वाहतूक पोलीस या विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक सीबीडी बेलापूर येथे बोलावली होती. सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन सुरू झालेली ७६ क्रमांकाची एनएमएमटीची बस कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद पडू देणार नाही, वा फेऱ्याही कमी होऊ देणार नाही, अशी भूमिका सरकारी अधिकाऱ्यांनी बैठकीत आमदारांसमोर घेतली आहे.
या बैठकीला पनवेल शहरातील रिक्षाचालक व त्यांचे नेते आमदार ठाकूर आणि नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे, प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी आनंद पाटील, एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड, सिटिझन युनिटी फोरमचे अरुण भिसे आणि मनोहर लिमये हे उपस्थित होते.
बसला मिळणारा प्रतिसाद ठीक आहे, पण रिक्षाचालकांच्या भवितव्याचा विचार प्रशासनातील अधिकाऱ्यांनी करावा, अशी भूमिका आमदारांनी मांडल्याने अनेकांनी त्याबद्दल नापसंती दर्शवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा