उरण : एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबईसाठी उरण, पनवेल व पेण मधील १२४ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा भूसंपदानाविरोधात एकवटण्याचे आवाहन एमएमआरडीएविरोधी समितीने एका निवेदनाद्वारे ग्रामस्थांना केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्च महिन्यात कोकण भवन येथील कोकण नगररचना विभागाकडे शेतकऱ्यांनी भूसंपादनाविरोधात २५ हजार हरकती व सूचना नोंदविल्या होत्या. मात्र या संदर्भात शासनाने कोणत्याही प्रकारची सुनावणी घेतली नाही. निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आदल्या दिवशी एमएमआरडीएची नवनगर प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली.

हेही वाचा >>> भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना

शासनाचा हा निर्णय भांडवलदार आणि विकासकांच्या फायद्यासाठी असल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. यामुळे येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आचारसंहिता संपताच मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर गावोगावी बैठकीचे नियोजन करण्याचे आवाहन एमएमआरडीएविरोधी शेतकरी संघर्ष समितीचे नेते सुधाकर पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा >>> गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात

बीकेसीच्या धर्तीवर केएससी संकुल

राज्य सरकारने एमएमआरडीएला तिसरी मुंबई विकसित करण्यासाठी नवनगर विकास प्राधिकरण (एनटीडीए) म्हणून नियुक्ती केल्याची अधिसूचना जाहीर केली आहे. यात उरण तालुक्यातील २९,पनवेल मधील – ७ तर पेण मधील ८८ अशा एकूण १२४ गावातील ३३२ चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे नवे शहर उभारण्यात येणार आहे. या शहराला मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर कर्नाळा- साई – चिरनेर(केएससी) संकुल या नावाने ओळखले जाणार आहे. यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai zws