उरण : मुंबईतील बिकेसीच्या धर्तीवर कर्नाळा-साई-चिरनेर (केएससी) संकुलाच्या उभारणीसाठी उरण,पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांत एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबई विरोधातील संघर्षाच्या जनजागृतीला सुरुवात झाली आहे. चिरनेर येथील ऐतिहासिक जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करून जनजागृती मोहिमेला सुरूवात करण्यात आली.
उरण,पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांत राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ‘केएससी नवनगर’ या नावाने तिसरी महामुंबई वसविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे नवी मुंबई, नैना , एमआयडीसी या प्रकल्पाच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी संपादित आणि नष्ट करून तेथे नव्याने शहर वसविले जाणार आहे. त्यामुळे या १२४ गावांतील घरे, गावे आणि शेतजमीनी संकटात आल्या आहेत. त्याविरोधात शेतकऱ्यांच्या माध्यमातून एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीने संघर्षाची भूमिका घेतली आहे. यासाठी गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यात येणार आहेत.
हेही वाचा…चिरनेरमध्ये बर्डफ्लूची साथ, ९ फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी
एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबईच्या विरोधात आरपारची लढाई छेडण्याचा शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे. याची सुरुवात चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीतून करण्यात आली. उरण, पनवेल पेण १२४ महसुली हद्दीतील गाव क्षेत्रात एमएमआरडीएने तिसरी मुंबई उभारण्याचा घाट घातला आहे. या प्रस्तावित तिसरी मुंबई उभारण्यासाठी शासनाने येथील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही. जमीनी देणार की नाही याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा, विचारविनिमयही केलेला नाही. असे असतानाही शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शासनाने भूसंपादनाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. या विरोधात निषेध, व्यक्त करीत २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. या बैठकीत संघर्ष समितीचे समन्वयक रुपेश पाटील,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील जेएनपीटीचे माजी विश्वस्त भूषण पाटील, राजिप माजी सदस्य महेंद्र ठाकूर, सरपंच भास्कर मोकल तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते. या बैठकीत प्रस्तावित तिसऱ्या मुंबईला कायमच विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या महामुंबई सेझला शेतकऱ्यांनी परतून लावले होते.
हेही वाचा…नवी मुंबई : ‘कोल्ड प्ले’ने वाहतूक ‘थंडावली’
आमच्या उरण,पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांत राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ‘केएससी नवनगर’ या नावाने तिसरी महामुंबई वसविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे नवी मुंबई, नैना , एमआयडीसी इ. सारख्याच सुपीक जमीनी संपादित आणि नष्ट करून तेथे शहर वसविले जाणार आहे. त्यामुळे या गावांतील घरे, गावे आणि शेतजमीनी संकटात आल्या आहेत. त्याविरोधात आम्ही संघर्ष करण्यास सज्ज झालो आहोत. सुधाकर पाटील, अध्यक्ष, एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती