पनवेल : तळोजा वसाहतीमध्ये एकही आरोग्यवर्धिनी केंद्र नाही. त्यामुळे रहिवाशांना खासगी दवाखान्यांवर अवलंबून राहावे लागते. पालिका प्रशासनाने सिडको मंडळाकडून तळोजा फेज दोन येथील केदार सोसायटीमध्ये खरेदी केलेल्या गाळ्यांमध्ये पुढील पंधरा दिवसांत आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्याकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पंधरवड्यापासून तळोजावासीयांना हक्काचा दवाखाना मिळणार आहे.
२० हजार लोकवस्ती असलेल्या परिसरात एक आरोग्यवर्धिनी केंद्र आणि पन्नास हजारांहून अधिक लोकवस्तीसाठी एक आपला दवाखाना पनवेल पालिकेने सुरू केला आहे. परंतु तळोजा परिसराची लोकसंख्या ७५ हजारांहून अधिक असली तरी येथे अद्याप आरोग्याची सुविधा पालिकेने सुरू केली नव्हती. सिडको मंडळाकडून गाळे मिळण्यास लागलेला विलंब यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. मात्र तळोजा वसाहतीमधील फेज दोनमध्ये सेक्टर २१ येथे केदार सोसायटीमध्ये सिडको मंडळाकडून गाळे खरेदी केल्यानंतर पालिकेने हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती दिली.
पुढील पंधरा ते वीस दिवसांत तळोजामध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू होईल. गाळे पालिकेच्या ताब्यात मिळाले असून वर्धिनी केंद्राच्या अंतर्गत कामाची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्यक्षात काम पूर्ण झाल्यावर तातडीने आरोग्य सेवा दिल्या जातील. – डॉ. आनंद गोसावी, वैद्याकीय आरोग्य अधिकारी, पनवेल पालिका.