लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल: तालुक्यामधील पळस्पे ते जेएनपीटी मार्गावरील पारगांव टेकडीवर फुलपीरबाबा शाह दर्ग्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी शुक्रवारी सिडको महामंडळासमोर फलकबाजीतून उपस्थित केला आहे. पारगांव टेकडीवरील दर्ग्यांमुळे प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला धोका असून अवैध दर्ग्यावर सिडको महामंडळ कारवाई कधी करणार, या आशयाचे फलक पनवेलच्या मनसेने महामार्गावर उभारले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर पनवेलच्या स्थानिक मनसेच्या पदाधिकारी दर्ग्यावरील कारवाईसाठी आक्रमक झाले आहेत.

2 फेब्रुवारीला या दर्ग्याशेजारील कमानीवर भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची तक्रार पारगावचे तरुण प्रेम पाटील यांनी पोलीसांत केली होती. त्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात संबंधित ट्रस्टच्या अध्यक्षाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नूकत्याच झालेल्या जाहीर सभेत मुंबईतील माहिम भागातील मजारचा उल्लेख केल्यानंतर तेथे राज्य सरकारने तातडीने कारवाई केली होती. त्यानंतर शुक्रवारी मनसेचे राज्य प्रवक्ता योगेश चिले यांनी पनवेल येथील दर्ग्यावर कारवाई करावे या आशयाचे फलक पारगाव गावाजवळील मार्गावर उभारले आहेत.

आणखी वाचा- नवी मुंबई : राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन

राष्ट्रध्वज अपमानाचे नेमके प्रकरण काय…

संबंधित फुलपीरबाबा शाह ट्रस्टच्या सदस्यांनी 26 जानेवारीला राष्ट्रध्वज ज्या बांबूला बांधला होता, त्याच बांबूला वरच्याबाजूला दर्ग्याचा हिरवा झेंडा फडकवला. प्रेम पाटील व त्यांचे मित्र सकाळी मॉर्निंग वॉकला या डोंगरावर गेले असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन पोलीसांत धाव घेतली. दर्ग्याच्या परिसरात अनेक ठिकाणी बेकायदा बांधकाम झाल्याच्या तक्रारीबाबत चौकशी गेल्या चार महिन्यांपासून सूरु आहेत.

पोलीसांची भूमिका

पारगांव डोंगराच्या टेकडीवर दर्गाचे बांधकाम अवैध की कायदेशीर याबाबत सिडको महामंडळाकडे लेखी अभिप्राय मागीतला आहे. सिडको मंडळाकडून अजूनही उत्तर आलेले नसले तरी सिडको मंडळाकडे पाठपुरावा पोलीसांनी घेतल्यावर त्यावर प्रक्रीया सूरु असल्याचे उत्तर देण्यात आले आहे. सिडको मंडळाच्या बांधकामाबद्दल अधिकृत उत्तरानंतर पोलीसांची पुढील कार्यवाहीची दिशा ठरेल असे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader