पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून काॅंग्रेस नेते राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्याच्या सूचना मनसैनिकांना मिळाल्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग रोखून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनाची कुणकुण पोलीसांना लागल्याने मनसैनिकांपेक्षा अधिक पोलीस महामार्गावर तैनात होते.
कळंबोली मनसे शहराध्यक्ष अमोल बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील हे पोलिसांसोबत तेथे उपस्थित होते. पोलिसांची संख्या अधिक असल्याचे समजताच द्रुतगती महामार्गापासून काही अंतरावर शीव पनवेल महामार्गावर मनसैनिक दूर झाले. राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत शीव पनवेल महामार्ग रोखून धरण्यासाठी जात असताना कळंबोली पोलिसांनी त्यांची धरपकड केली.