उरण तालुक्यातील व जेएनपीटी परिसरातील अपघातांच्या संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.त्यामुळे जेएनपीटी तसेच संबंधित आस्थापनांनी याकडे लक्ष देऊन रस्ते सुरक्षेसाठी काम करावे या मागणीसाठी सोमवारी करळ फाटा येथे मनसेने चक्का जाम आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. मात्र जेएनपीटी प्रशासनाने या संदर्भात ११ मे रोजी मनसे नेत्या सोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने मनसेचे चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वारंवार मान्य करूनही जेएनपीटी, सिडको तसेच भारतीय राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण उरण-पनवेलमधील वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करीत नव्हती. त्यामुळे रायगड जिल्हा मनसेचे अध्यक्ष अतुल भगत यांनी मनसे सरचिटणीस माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वात करळ फाटा येथे चक्का जाम करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच न्हावा शेवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलवडे व न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुक्मिणी गलांडे यांनी तीन राखीव पोलिसांच्या बसेस तसेच शंभर पोलीस व अधिकारी यांच्यासह कडक बंदोबस्त ठेवला होता.
मनसेच्या या चक्का जामला उरण तालुका सर्वपक्षीय संघर्ष समितीनेही पाठिंबा दिला होता. त्यामुळे शेकापचे तालुका चिटणीस महादेव घरत व उत्कर्ष समितीचे गोपाळ पाटील हे उपस्थित होते. दरम्यान जेएनपीटीचे व्यवस्थापक एन. के. कुलकर्णी यांनी जेएनपीटी अध्यक्षांनी या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी वेळ देऊन बैठक बोलविली असल्याने चक्का जाम मागे घेण्याची विनंती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना केली. त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी बुधवारच्या चर्चा सकारात्मक करून प्रश्न सोडविण्याच्या अटीवर चक्का जाम आंदोलन मागे घेतले.
मनसेचे अपघातविरोधी चक्काजाम आंदोलन मागे
मनसेच्या या चक्का जामला उरण तालुका सर्वपक्षीय संघर्ष समितीनेही पाठिंबा दिला होता
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 10-05-2016 at 03:35 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns party rollback stir against accident cases