नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली येथे न्यू होराईझन स्कॉलर्स स्कुल अँड नियो किड्स शाळेविरोधात शुल्क वाढ कमी करण्यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज आंदोलन केले. यापूर्वीही सदर शाळेविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र पालकांना दाद देण्यात आली नाही. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालकांच्या समवेत आंदोलन केले.
करोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांची वेतन कपात आजही तशीच आहे, अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, हे लक्षात घेत शासनानेही खाजगी शाळांना शुल्क वाढ न करण्याचे सूचित केले होते. मात्र ऐरोलीतील न्यू होराईझन स्कॉलर्स स्कुल अँड नियो किड्स शाळेने १५ टक्के शुल्क वाढ केली आहे, शिवाय ज्यांनी शुल्क वेळेवर भरले नाही अशांना एखाद्या खाजगी सावकाराप्रमाणे रोज १०० रुपये दंड ठोठावला आहे. या शिवाय ज्यांनी शुल्क भरले नाही अशा विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढत शाळा प्रांगणात उभे केले जात असल्याचाही अनेक पालकांनी आरोप केला आहे. त्यामुळे मनसेने शाळा प्रशासन विरोधात आंदोलन छेडले होते. यावेळी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून शाळेविरोधात निदर्शने तसेच घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, मनसे शहर सहसचिव नितिन लष्कर, मनसे दिघा विभाग अध्यक्ष भूषण आगविले, मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष दशरथ सुरावसे, उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, शहर सचिव निखिल थोरात, शहर सहसचिव श्रीधर रणपिसे, शहर सहसचिव स्वप्निल जोशी, शहर सहसचिव गणेश भोसले तसेच मनविसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
- लेट फी भरल्यास प्रति दिन १०० रुपये आकारण्यात येतात ते रद्द करावे.
- १५ टक्के फी वाढ करण्यात आली असता ती कमी करण्यात यावी.
- ओळखपत्रासाठी ३०० रुपये आकारले जातात ते रद्द करावे.
- ३०० रुपये न भरल्यास ज्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवले गेले त्यांच्या पालकांची माफी मागावी.
- पुस्तकांची किंमत एवढी का ठेवण्यात आली, नक्की त्याची एवढी किम्मत आहे का? ते पुराव्यासह पालकांना सांगणे