पनवेल – गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी मावळ मतदारसंघात महायुतीच्या प्रचारापासून मनसे कोसोदूर आहे. यापूर्वी पनवेलमध्ये महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आकुर्ली येथे झाला. त्यामध्येही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले नाही. त्यामुळे सामान्य मनसैनिक संभ्रमात आहेत. मनसे आणि महायुतीचे प्रचारसूत्र अद्याप न ठरल्याने मनसे लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराच्या अंतिमवेळी सक्रीय होण्याची चिन्हे आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कर्जत, पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण हे विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मावळ मतदारसंघात अजूनही कोठेही मनसेचे पदाधिकारी सक्रीय झाले नसल्याने महायुतीच्या व्यासपीठावर अजूनही मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे छायाचित्र दिसत नाही. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारामधील फलकांवर राज ठाकरे यांचे छायाचित्र वापरले गेले नाही. त्यामुळे मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या पाठिंब्याच्या घोषणेनंतर मनसेचे नेते महायुतीच्या व्यासपीठावरून प्रचार करतील अशी अपेक्षा मनसैनिकांना होती. परंतु अद्याप तरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मनसेच्या वरिष्ठांकडून प्रचारासाठी कोणतीही सूचना मिळाली नाही. तसेच महायुतीचे पनवेलमधील नेत्यांकडून कोणतेही आमंत्रण आले नसल्याने मनसैनिक संभ्रमात पडले आहेत.
हेही वाचा – ऐरोली खाडीत मृत माशांचा खच….मच्छीमार हवालदिल; मासे का मरत आहेत ?
हेही वाचा – मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा द्रुतगती महामार्गावर अपघाती मृत्यू
महायुतीकडून इतर लोकसभा मतदारसंघात ज्याप्रमाणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येते, त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघातही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येत आहे. परंतु मनसेचे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमले आहेत त्यांची चर्चा महायुतीच्या उमेदवारांसोबत सुरु आहे. २४ तारखेपासून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा याचे नियोजन केल्यानंतर २५ किंवा २६ तारखेनंतर मनसे सर्व ताकदीने प्रचारात सक्रीय दिसेल. – योगेश चिले, प्रवक्ता, मनसे