|| शेखर हंप्रस
मोबाइलवरील दिशादर्शक अॅपमुळे रोजगारावर गंडांतर
रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुणीही नसताना औद्योगिक वसाहतीत वाट शोधणाऱ्या ट्रकचालकांना ईप्सितस्थळी घेवून जाणाऱ्या ‘वाटाडय़ां’ना स्मार्ट फोनमधील तंत्रज्ञानाने आव्हान निर्माण केले आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून रात्र जागवूनही एखादे गिऱ्हाईक मिळत नाही. ‘आम्ही जगलो काय आणि मेलो काय.. कुणाला फरक पडत नाही..अशी भावनिक साद ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीशी बोलताना एकाने व्यक्त केली.
राज्यभरातील औद्योगिक वसाहतींमध्ये वाटाडे म्हणून काम करणाऱ्या सुमारे दहा ते बारा हजार जणांवर ही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. औद्योगिक विभागात नवख्या व्यक्तीला पत्ता शोधणे जिकिरीचे असते. नवी मुंबई परिसरात १९६२ मध्ये औद्योगिक वसाहत स्थापन झाली. याठिकाणी विशिष्ट कंपनीला पत्ता शोधणे अतिशय जिकिरीचे काम होते. रात्री-अपरात्री अवजड वाहनांतून सामान घेऊन आलेले चालक पत्ता शोधताना मेटाकुटीस येत. त्यांना कंपनीचा पत्ता शोधून देण्याचे काम वाटाडे करीत. त्यातून नवी मुंबई परिसरात सुमारे हजारेक लोक अर्धवेळ अथवा पूर्णवेळ वाटाडे काम करीत होते.
सकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान मोठय़ा शहरात जड वाहनांना बंदी आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत येणारे ट्रक रात्रीच येतात. कंपन्यांचे पत्ते हे भूखंड क्रमांक, रस्ता क्रमांक असे असतात. ठळक सांगता येईल अशी खूण परिसरात नसते. पुन्हा रात्र असल्याने रस्त्यावरही कुणी नसते. अशा परिस्थितीत वाटाडे संबंधितांना मार्ग दाखवितात.
‘वाटाडयां’चा रोजीरोटीचा प्रश्न
त्या बदल्यात ते ट्रकचालकाकडून पैसे घेत. गळ्यातील विशिष्ट गमज्यामुळे हे वाटाडे ओळखले जातात. औद्योगिक वसाहतीत ये-जा करणाऱ्यांना ते माहिती असतात. वाट शोधणाऱ्याला ईप्सितस्थळी सोडून हे वाटाडे पुन्हा पायी अथवा बसने महामार्गावर येऊन दुसऱ्या ट्रकची वाट पाहतात.
या वाटाडय़ांची आता फारशी गरज उरलेली नाही. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील दोन हजार वाटाडे बेरोजगार झाले आहेत. दुसरा कोणताही व्यवसाय नसलेली काही मोजकी मंडळी अजूनही महामार्गावर ग्राहकाची वाट पाहत असतात. मात्र त्यांच्या हाती काही फारसे पडत नाही.
विश्वास आणि सुरक्षा
दोन-अडीचशे रुपयांच्या मोबदल्यात ट्रकचालकांना योग्य पत्ता दाखविणाऱ्या वाटाडय़ांनी कधीही वाकडे पाऊल टाकल्याचे उदाहरण नाही. रस्ता दाखविण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे वाटाडय़ांमुळे संबंधित कंपनीचा माल सुरक्षितरीत्या पोहोचविला जात होता.
आमचा व्यवसाय असंघटित आहे. काळ बदलला, तशी आमची आता गरज उरलेली नाही. आम्ही जगलो काय आणि मेलो काय कुणाला काही फरक पडत नाही. – नरेश जाधव (वाटाडे)
पत्ता शोधणे सोपे
हातातील मोबाइल स्मार्ट झाल्यानंतर मात्र या वाटाडय़ांना गिऱ्हाईक मिळेनासे झाले. कारण इंटरनेट सुविधा मोबाइलमध्ये उपलब्ध झाल्यानंतर गुगल नकाशाद्वारे पत्ता शोधणे सोपे झाले आहे. साहजिकच पत्ता शोधण्यासाठी आता ट्रकचालकांना वाटाडय़ांची फारशी गरज उरलेली नाही.
औद्योगिक वसाहतीमध्ये केवळ रात्रीच प्रवेश असतो. रात्री दुकाने, छोटे-मोठे हॉटेल्स सर्व बंद असतात. रस्त्यावर तर माणूसही दिसत नाही. त्यामुळे कुणाला पत्ताही विचारता येत नाही. त्यासाठी पूर्वी आम्ही अशा वाटाडय़ाची मदत घेत होतो. मात्र आता मॅपअॅपमुळे वाटाडय़ांची गरज भासत नाही.
रामकृष्ण पिल्लई, ट्रकचालक
१९६५ मध्ये सोलापूर जिल्ह्य़ातील आलेगांव येथून मुंबईत आलो. १९९४ पासून महापेमध्ये वाटाडय़ा म्हणून काम करत होतो. रोज किमान दोन-तीन गाडय़ांचे मिळून १००० ते १२०० रुपये मिळत होते. मात्र आता ग्राहक मिळत नाहीत. मी आता दुसरे कामही करू शकत नाही. -रामचंद्र कांबळे (वाटाडे)