उरण : मोरा बंदर ते मुंबई च्या भाऊचा धक्का दरम्यानच्या ७५ कोटी खर्चाच्या मोरा रोरो सेवेचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडले होते. मात्र हे काम पुन्हा एकदा वेगाने सुरू करण्यात आले आहे. हे काम कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०२५ ला पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली.

बहुप्रतीक्षित असलेल्या मोरा मुंबई रोरो सेवेचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडले होते. यातून मार्ग काढण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डा कडून देण्यात आली आहे. बोर्डाच्या अखत्यारितील मोरा -भाऊचा धक्का या सागरी मार्गावर रोरो सेवेचे काम सुरू आहे. ७५ कोटी खर्चाचे हे काम अनेक अडथळ्यांमुळे २०१८ पासून कासव गतीने सुरू आहे. मात्र मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला वेग आला होता.

सातत्याने होणाऱ्या या जलमार्गाच्या कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. यातील रेवस जेट्टीच्या कामात पाच कोटींच्या खर्चात वाढ झाली आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून या जेट्टीचे काम करण्यात येत आहे. या जेट्टीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे.

मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का या रो रो मार्गावरील भाऊचा धक्का ही जेट्टी कार्यान्वित झाली आहे. मात्र मोरा जेट्टीचे काम सात वर्षांपासून रखडले आहे. हे काम रखल्याने ५० कोटींच्या कामाची रक्कम ७५ कोटींवर पोहचली आहे. तरीही जेट्टीचे काम अपूर्णच असून जेट्टी पर्यंत जाण्यासाठी मार्ग ही होऊ शकलेला नाही.

मोरा जेट्टीच्या उभारणीतील अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर कामाला वेग आला असून येत्या डिसेंबर २०२५ पर्यंत जेट्टीचे काम पूर्ण करण्यात येईल. – सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड