उरण : मोरा ते मुंबई या जलसेवेत सोमवारी ओहटी मुळे अडथळा निर्माण होणार असून मुंबई वरून दुपारी २ ते साडेपाच तर मोरा येथून दुपारी ३ ते ६.३० वाजेपर्यंत ही लाँच सेवा बंद रहाणार आहे. त्यानंतर मुंबई वरून रात्री ८ व मोरा येथून रात्री ९ वाजे पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना तीन तासांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मोरा बंदरात किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून समुद्राला येणाऱ्या ओहटीमुळे पाणी कमी झाले की प्रवासी बोटी किनाऱ्याला लागत नाहीत. बोटी या गाळात रुतण्याची शक्यता असल्याने या कालावधीत लाँच सेवा बंद ठेवण्यात येत आहे. तीन ते साडेतीन तासांचा विलंब झाल्याने या मार्गाने उरण आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून लाखो रुपये खर्च करून मोरा बंदरातील गाळ काढला जात असूनही मोरा मुंबई जलप्रवासातील प्रवाशांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा : नवी मुंबई: घरमालक नाईट ड्युटीला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी केली घरफोडी
ओहटीचा उरण अलिबाग जल प्रवासा वरही परिणाम
मोरा मुंबई प्रमाणे उरण ते अलिबाग दरम्यानची जिल्हापरिषदेच्या माध्यमातून जलसेवा चालविली जातअसून रेवस व करंजा या दोन्ही बंदरात ही समुद्राच्या ओहटीचा परिणाम होत असून ही सेवा ही बंद करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना याचा फटका बसत आहे. यामध्ये रेवस वरून दुपारी ३ वाजता शेवटची करंजा वरून ३.३० वाजता बोट सुटेल त्यानंतर रेवस वरून ६ वाजता तर करंजा येथून ६.३० वाजता बोट सोडण्यात येईल.