प्लास्टिकमुक्त नवी मुंबई शहर हे उदिदष्ट नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्याप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी कच-यात पडलेल्या प्लास्टिक संकलन मोहिमा राबविल्या जात आहेत. टाकाऊतून टिकाऊ उपक्रम राबविले जात आहेत तसेच प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या वर्षभरात प्लास्टिक पिशव्या तसेच प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर अथवा साठा आढळलेल्या ६१४ दुकाने, आस्थापना यांच्यावर धडाकेबाज कारवाई करीत ३१ लाख ४० हजार दंडात्म्क रक्क्म वसूल करण्यात आलेली आहे. तसेच ३ लाख ५९ हजार ३२५ किलो ४७ ग्रॅम इतक्या वजनाचा प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : उरणमधील वृद्धेची दागिन्यांसाठी हत्या; आरोपीला अहमदनगरमधून अटक
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई राज्यात नेहमीच प्रथम क्रमांकावर व यावर्षी देशात तृतीय क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नावाजली गेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्येही राज्यातील सर्वप्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून नवी मुंबईचा गौरव झालेला आहे. परंतू स्वच्छता आणि पर्यावरणाच्या दृष्टींने प्लास्टिक हा मोठा घातक अडथळा आहे.
हेही वाचा- सिडकोचे कोटींचे भूखंड बेकायदा रोपवाटिका चालकांना आंदण, पालिका व सिडकोचे दुर्लक्ष
एकल वापराच्या प्लास्टिक वस्तुंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचनेव्दारे जाहीर करण्यात आले आहे. सुधारित घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये पॉलिस्टीन आणि विस्तारित पॉलिस्टिरीनसह सिंगल यूज प्लास्टिकलाही बंदी घालण्यात आली आहे. या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास पहिल्या गुन्ह्याच्या वेळी ५ हजार, दुस-यांदा गुन्हा घडल्यास १० हजार आणि तिस-या गुन्हाच्या वेळी २५ हजार व तीन महिन्यांचा कारावास राहील असे जाहीर करण्यात आलेले आहे.तरी सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणाला व मानवी जीवनाला हानीकारक असणा-या प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर पूर्णत: टाळावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
वर्षभरात सातत्याने प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात येते. वर्षभरात ३१ लाखाहून अधिकचा दंडवसूल करण्यात आला आहे.आगामी काळातही प्लास्टिक विरोधी कारवाया करण्यात येईल. नागरीकांनी पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी केले आहे.