नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला रात्री १२ वाजल्यापासून ते सायंकाळी ४ पर्यंत ५ हजारून अधिक नागरिकांनी भेटी देत समाधान व्यक्त केले आहे. ऐरोली सेक्टर १५ येथील भूखंड क्रमांक २२ (ए) येथे  ५७५० चौ.मी क्षेत्रफळाच्या भूखंडावर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात आले आहे. यामध्ये भव्य असे ध्यानसाधना केंद्र, चलचित्र, ग्रंथालय, छायाचित्र वस्तू संग्रहालय, बहुउद्देशीय सभागृह उपलब्ध करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दि. १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी ऐरोली येथील स्मारकांमध्ये दाखल झाले होते. मागील दोन वर्षांपासून चैत्य भूमीवर अनुयायांना जात येत नव्हते, मात्र मागील वर्षांपासून नवी मुंबईतील नागरिकांना या भव्य दिव्य स्मारकाच्या माध्यमातून महामानव यांना अभिवादन करता आले त्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे. स्मारकामध्ये बाबासाहेबांचे जीवनचरित्र दर्शन घडविणारे दुर्मिळ छायाचित्रांचे दालन, ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण इ-लायब्ररीसह समृध्द ग्रंथालय, अत्याधुनिक होलोग्राफीक आभासी चलचित्रप्रणालीव्दारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची सुविधा, एकाच वेळी २०० व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्यतम ध्यानकेंद्र, संविधानाविषयीच्या पुस्तकाचे विशेष दालन तसेच २५० आसन क्षमतेचे वातानुकुलीत प्रशस्त सभागृह अशा उत्तम दर्जाच्या सुविधांनी हे स्मारक वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.

हेही वाचा >>> नेरुळमध्ये शिवाजी चौकात शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा बसविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची प्रतीक्षा

रस्त्यावरून लांबूनच नजरेत भरणारा ५० मीटर उंचीचा भव्य डोम लक्ष वेधून घेतो. बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतिक म्हणून या डोमला पेनच्या नीबचा आकार देण्यात आलेला आहे. ३ हजाराहून अधिक ग्रंथसंपदेने समृध्द असे येथील इ-लायब्ररी सुविधेसह अत्याधुनिक ग्रंथालय हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या व त्यांच्या विचारांचा जागर करणाऱ्या पुस्तकांमुळे अभ्यासकांसाठी एक महत्वपूर्ण सुविधा आहे. प्रशस्त असे नाविन्यपूर्ण संकल्पनावरील आधारित हे डॉ बाबासाहेबांचे स्मारक शहरासाठी एक पर्वणीच ठरत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 5 thousand citizens visit babasaheb ambedkar memorial ysh