नवी मुंबई : महापालिकेच्या सर्व विभाग आणि विभागीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन स्वच्छतेला प्राधान्य देत कागदपत्रे आणि नस्तींचे निंदणीकरण, तपासणी, नष्टीकरण आणि निर्लेखनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये आवश्यक नसलेले आणि मुदतबाह्य झालेल्या ५० हजार २२७ नस्ती नियमांचे पालन करून नष्ट करण्यात येत आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मुदतबाह्य नस्तींचे नष्टीकरण करण्यात येत आहे. यामध्ये सर्व अभिलेखांचे नियमानुसार ‘अ वर्ग, ब वर्ग, क १ वर्ग, क वर्ग, ड वर्ग’ असे वर्गीकरण करून त्यांची जतन मुदत निश्चित करण्यात आली आहे. आवश्यक नसलेले आणि मुदतबाह्य झालेले ५० हजार २२७ नस्ती या नियमांचे पालन करून नष्ट करण्यात येत आहेत. तसेच कालावधीनुसार अभिलेख कक्षाकडे ते पाठविण्यात आले आहेत. यामध्ये ब वर्गातील ४६, क १ वर्गातील ३६ हजार ८०८, क वर्गातील ४ हजार ०६६ आणि ड वर्गातील ९ हजार ३०७ नस्तींचा समावेश आहे. या कार्यवाहीत बेलापूर अभिलेख कक्षातील क १ वर्गातील ९ हजार ९५५ आणि क वर्गातील २ हजार ७४९ नस्तींचा तसेच ऐरोली अभिलेख कक्षातील ब वर्गातील ४६, क १ वर्गातील २६ हजार ८५३ आणि क वर्गातील १ हजार ३१७ नस्तींचा समावेश आहे. ड वर्गातील ९ हजार ३०७ नस्तीदेखील नष्ट करण्यात येत आहेत. या ५० हजार २२७ नस्तींमध्ये स्थानिक संस्था कर / उपकर विभागाच्या २३ हजार ०७० नस्ती असून, मालमत्ता कर विभागाच्या ६४७ नस्तींचा समावेश असल्याची माहिती या विभागाचे उपायुक्त शरद पवार यांनी दिली आहे.