सिडकोच्यावतीने उरण तालुक्यातील चाणजे, रानवड, नागाव आदी गावातील जमिनी संपादीत करण्यासाठी अधिसूचना बुधवारी जाहीर केली आहे. या जमिनीवर येथील शेतकऱ्यांची शेकडो राहती घरे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या घरांचे काय होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यामध्ये चाणजे हद्दीतील घरांची संख्या ८०० ते ९०० पेक्षा अधिक आहे. यामध्ये ७० वर्षांपूर्वीच्याही घराचा समावेश असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा- उरणमध्ये मुसळधार पाऊस; रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकदारांची तारांबळ
सिडकोने १९७० मध्ये नवी मुंबईसाठी भूसंपादन करीत असताना उरण तालुक्यातील काही गावातील जमिनीचे संपादन न करता अधिसूचित (नोटिफिकेशन मध्ये समाविष्ट) करण्यात आली होती. मात्र, या सर्व जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे शेतकरी व त्यांच्या वारसांनी या जमिनीवर आपल्याला राहण्यासाठी घरांचे बांधकाम केले आहे. मात्र, सिडकोने आशा प्रकारच्या घरांची बांधकामे असलेल्या जमिनींचे सर्व्हे नंबर भूसंपादनात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सिडको विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : दिवाळीच्या तोंडावर सुका मेवा महागला ; पिस्ता, खारीक, मनुका वधारला
चाणजे परिसरातील जमिनीच्या संपदानाला येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. याकरीता चाणजे येथील शेतकऱ्यांनी यापूर्वी आंदोलनही केले आहे. सिडकोने बुधवारी जाहीर केलेल्या भूसंपदानाच्या नोटीसला आमचा विरोध आहे. यामध्ये चाणजे परिसरातील तेलीपाडा, मुळेखंड, कोळीवाडा व चाणजे विभागातील ९०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची राहती घरे आहेत. यामध्ये १९५२ सालच्या घराचाही समावेश आहे. त्यामुळे या विरोधात शेतकरी असल्याची माहिती तेलीपाडा येथील शेतकरी अरविंद घरत यांनी दिली आहे.