नवी मुंबई: ‘निश्चय केला – नंबर पहिला’ हे ध्येय ठेवून नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी सज्ज झालेले आहे. या अनुषंगाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१३’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातील निसर्ग उद्यानात स्वच्छ चित्रकला स्पर्धेत ९ हजार ५०० हुन अधिक विद्यार्थी चित्रकारांनी स्वच्छ नवी मुंबईचे सुंदर चित्र रेखाटले आहे.
कोपरखैरणे से. १४ येथील निसर्गोद्यानामध्ये सकाळी ७च्या आधीपासूनच शाळानिहाय विद्यार्थ्यांचे समुह स्पर्धास्थळी रांगेने उपस्थित राहण्यास सुरुवात झाली होती. याठिकाणच्या मोकळ्या व निसर्गरम्य तसेच सकाळच्या वेळेतील काहीशा थंड वातावरणात विद्यार्थ्यांची ८ हजार इतकी अपेक्षित उपस्थिती वाढली आणि ९५०० हून अधिक विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धेकरिता माझे शहर – माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त नवी मुंबई आणि ३आर (Reduce, Reuse, Recycle) हे ३ विषय देण्यात आले होते. या विषयांवर सहभागी विद्यार्थ्यांनी व चित्रकारांनी आपल्या मनातील स्वच्छ नवी मुंबईचे चित्र रेखाटले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ३ चित्रांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार असून १०० सर्वोत्तम चित्रांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रे प्रदान कऱण्यात येणार आहेत.