पनवेल : यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल २०२४ ते ४ मार्च या दरम्यान पनवेल महापालिकेच्या तिजोरीत ३४१ कोटींहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा एकमेव आर्थिक स्रोत असून पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी मालमत्ता लवकरात लवकर भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

३१ मार्च ही मालमत्ता कर भरण्याची शेवटची तारीख आहे. मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये दर महिन्याला २ टक्क्यांची वाढ होत असल्याने करदाते मालमत्ता कर भरत आहेत. मागील चार दिवसात दररोज पालिकेच्या तिजोरीत १ कोटीहून अधिक रकमेची भर पडत आहे. यामध्ये १ ते चार मार्च या दरम्यान ५ कोटी ५६ लाख रुपयांचा भरणा झाल्याचे पालिकेने कळवले आहे.

मालमत्ताधारकांना नावामध्ये बदल करायचा असल्यास महापालिकेच्या ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून करता येईल. या ॲपमध्ये नाव बदलाकरीता विनंती केल्यास महापालिकेकडून नाव बदलानंतर संबधितांस नोटिफिकेशन मिळणार आहे. मालमत्ताधारकांना मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी महापालिकेने ‘PMC TAX APP’ विकसित केले आहे. www. panvelmc.org या संकेतस्थळावर जाऊनही करदाते त्यांचा कर भरु शकतील असे पालिकेने प्रसिद्धीपत्रकातून कळवले आहे. अधिक माहितीसाठी १८०० ५३२०३४० या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे.

मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाच स्रोत आहे. महापालिकेची विविध विकास कामे सध्या सुरू असून महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. – स्वरूप खारगे, सहाय्यक आयुक्त, पनवेल महानगरपालिका

Story img Loader