पनवेल : पनवेल महापालिका प्रशासनाने पालिका क्षेत्रातील महिला आणि बालकांच्या आरोग्याचा विचार करता सर्वाधिक खर्चाची तरतूद पालिकेच्या पहिल्या माता बाल संगोपण रुग्णालयासाठी केली आहे. दोन एकर जागेवर हे आठ मजली ‘हिरकणी’ रुग्णालय बांधण्यासाठी तब्बल पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला जाणार आहे. पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी नुकत्याच एका बैठकीत शहर अभियंतांना या रुग्णालय इमारतीच्या आराखड्याबद्दल काही निवडक बदल सुचवले आहेत. अंतिम बदलानंतर पालिकेच्या लवकरच होणाऱ्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर बांधकामाची निविदा प्रक्रिया पालिका राबविणार असल्याचे पालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
पनवेल महापालिका कळंबोली सर्कलवरुन जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गावर नौपाडा गावाच्या विरुद्ध दिशेला ७,५३९ चौरस मीटर सिडकोकडून मिळालेल्या भूखंडावर हे रुग्णालय उभारले जात आहे. ४५० रुग्णखाटांसाठी तळमजल्यावर ८ मजली इमारतीमधील ३ लाख ४१ हजार चौरस फुटाचा वापर रुग्णालयासाठी केला जाईल. पालिकेच्या माजी नगरसेवकांनी या रुग्णालयाला ‘हिरकणी’ या नावाचा ठराव मंजूर केला आहे. १२० वाहने रुग्णालयात उभी राहतील एवढ्या क्षमतेचे हे रुग्णालय असणार आहे. पालिका क्षेत्रात सध्या पालिकेचे २६ वैद्यकीय दवाखाने सुरू आहेत. मात्र गर्भवती महिलांना सार्वजनिक आरोग्य विभागाने पनवेल शहरामधील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय तसेच कळंबोली येथे धर्मादाय तत्वांवर चालविले जाणाऱ्या एमजीएम रुग्णालयावर अवलंबून रहावे लागते.
हेही वाचा…उरण, पनवेल जेएनपीए परिसरात कंटेनर अपघातांची मालिका
पालिका क्षेत्रात वर्षाला १३००० हजारांहून अधिक बालकांचा जन्म होतो. पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील महिलांना सुद्धा या रुग्णालयाचा लाभ होईल. सध्या प्रसुतीनंतर अतिदक्षता विभाग माता व बालकांसाठी पालिकेची हक्काची कोणतीही सोय नसल्याने पालिकेला असे रुग्ण नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात पाठवावे लागतात. तेथेही खाटा उपलब्ध नसल्यास हे रुग्ण मुंबईकडील सरकारी वैद्यकीय सेवेकडे धावू लागतात. पालिकेचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांच्या कारकिर्दीत या रुग्णालयाची गरज असल्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. त्यानंतर या रुग्णालयासाठी लागणाऱ्या प्रस्ताव आणि खर्चासह रुग्णालयाच्या नावाला ‘हिरकणी’ला माजी नगरसेवकांनी सभागृहात मंजूरी दिली होती.
रुग्णालयासाठी लागणारा भूखंडाचे हस्तांतरण सिडको मंडळाकडून झाल्यानंतर विद्यमान आयुक्त मंगेश चितळे यांनी या रुग्णालयासाठी मॅरथॉन बैठकीचे सत्र सुरू केले. वेळोवेळी रुग्णालय इमारतीच्या आराखड्यात बदल सूचविल्यानंतर आयुक्त चितळे यांनी दोन टप्यात या रुग्णालयाचे बांधकाम पुर्ण करण्याचे नियोजन आखण्याच्या सूचना पालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांना दिल्या. त्यामुळे पुर्ण इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर पहिल्या टप्यात अडीचशे रुग्णखाटांचे रुग्णालय पालिका सुरू करण्यासाठी नियोजन करत आहे. ४५० रुग्ण खाटांचे हे रुग्णालय चालविण्यासाठी वैद्यकीय अधिक्षकापासून वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पारिचारीका, वार्डबॉय, सूरक्षा रक्षक आणि इतर ३०० हून अधिक आरोग्यसेवक या रुग्णालयासाठी लागणार आहेत.
हेही वाचा…गणेश नाईकांच्या मंत्रिपदामुळे शहराला वाढीव पाण्याची आस, बारवी धरणाचे पाणी मिळण्याची आशा बळावली
‘स्वराज्य’साठी १५० कोटी तर ‘हिरकणी’साठी ५०० कोटी
पालिकेचे नवीन प्रशासकीय भवन म्हणजे ‘स्वराज्य’ या इमारतीच्या बांधकामासाठी दीडशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च पालिका करत आहे. या भवनापेक्षा तीन पटीने तब्बल पाचशे कोटी रुपये खर्च पालिका माता बाल संगोपण रुग्णालयासाठी करणार आहे. या रुग्णालयामुळे पनवेलमधील गर्भवती महिला आणि बालकांना मोठा लाभ होईल.