लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : वेगाने वाढणाऱ्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. परंतु मागील ९ वर्षांपासून कोपरखैरणे हा विभाग महापालिकेच्या आरोग्यसेवांपासून वंचित आहे. कोपरखैरणे सेक्टर २२ येथील महापालिकेचे माता बाल रुग्णालयाचे नवीन बांधकाम सुरू असून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच याचे काम पूर्ण होणार असून नागरिकांच्या सेवेत दाखल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कोपरखैरणे सेक्टर २२ येथे महापालिकेचे माता बाल रुग्णालय होते, परंतु ते मागील काही वर्षांपासून बंद आहे. येथील अनेक गरोदर महिलांना ७ कि.मी. अंतरावरील ऐरोली आणि ४ कि.मी. अंतरावरील वाशी महापालिका रुग्णालय गाठावे लागते. हे रुग्णालय बंद पडल्याने येथील नागरिकांना वाशी,नेरुळ, ऐरोली येथील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात ७ ते ८ किलोमीटरची पायपीट करून जावे लागत आहे. प्रसंगी खासगी रुग्णालयाचा आधारही घ्यावा लागत आहे.
दरम्यानच्या कालावधीत महापालिकेने त्याच विभागात दुसरी आरोग्य सुविधायुक्त तयार इमारत खरेदी करण्याचे नियोजन आखले होते,मा त्र ती इमारत अनधिकृत बांधकामाच्या कचाट्यात सापडली होती, त्यामुळे ती इमारत खरेदी करण्याचा प्रस्ताव रद्द करून पुन्हा जुन्याच इमारतीच्या जागी नवीन बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. सन २०२२ पासून या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आतापर्यंत ९० टक्के बांधकाम झाले आहे. अभियंता विभागाकडून हस्तांतर होताच सुरू करण्यात येईल अशी माहिती वैद्याकीय अधिकारी प्रशांत जवादे यांनी दिली आहे.
कोपरखैरणे येथील माताबाल रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले असून महिन्याभरात आरोग्य विभागाकडे हस्तांतर करण्यात येईल. -शिरीष आरदवाड, शहर अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका
दुमजली इमारतीत सुविधा
कोपरखैरणे येथील रुग्णालयाची नवीन इमारत तळ आणि दुमजली अशी उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात तुर्भे आणि नेरुळ येथील रुग्णालयासारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. रुग्णालयात माताबालकांना, प्राथमिक उपचार, आपत्कालीन विभाग इत्यादि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.