नवी मुंबई : राज्य शासनावर दडपशाहीचा आरोप करत आज नवी मुंबई पोलीस आयुक्ताल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने मोर्चा काढला. मात्र आयुक्तांना भेटण्यास खासदार राजन विचारे यांना मज्जाव करण्यात आल्याने आयुक्तालय प्रवेशद्वारावरील बंदोबस्ताला असणारे पोलीस आणि राजन विचारे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांवर शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव टाकला जात आहे. जे नेते शिंदे गटात सामील होत नाहीत त्यांना तडीपार करणे, खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. याचाच निषेध म्हणून नवी मुंबईतील बेलापूर येथे सभा झाल्यानंतर पोलीस आयुक्ताल्यावर मोर्चा काढण्यात आला. यात खासदार अरविंद सावंत , विनायक राऊत ,आमदार भास्कर जाधव शिष्टमंडळातील या नेत्यांना आयुक्तांच्या भेटीसाठी आत सोडण्यात आले .
मात्र काही वेळाने आलेले खासदार राजन विचारे यांना अडवण्यात आले. त्यावरून बंदोबस्तावरील पोलीस आणि विचारे यांच्यात बाचाबाची झाली. राजरोज तरी दडपशाही करू नका असे पोलिसांना राजन विचारे यांनी सांगितले. हा गोंधळ पाहून काही वरिष्ठ अधिकारी आले व त्यांना तुम्ही जाऊ शकता असे पोलिसांनी सांगितले. मात्र तुमच्या सोबत गाडीत जे कार्यकर्ते आहेत ते जाऊ शकणार नाहीत असे सांगण्यात आले. मात्र गाडीत नवी मुंबई बेलापूर संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, ऐरोली अध्यक्ष द्वारकानाथ भोईर असल्याची माहिती दिल्यावर त्यांनादेखील आत सोडण्यात आले. या वादावादीमुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .