नवी मुंबई : ४० लाख रुपये दिल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २ फेब्रुवारीला होणा-या परिक्षेची प्रश्नपत्रिका देतो असे सांगणारे फोन आल्याने उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला होता. गुरुवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सचिवांनी नवी मुंबईत (बेलापूर) पत्रकार परिषद घेऊन २ फेब्रुवारीला होणा-या परिक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका सूरक्षित कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले. परीक्षार्थी उमेदवारांनी याबाबत आयोगाकडे केलेल्या इ मेलवरील तक्रारींमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे याबाबत गुरुवारी लेखी तक्रार केल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २ फेब्रुवारीला गट – ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर विभाग नियंत्रक, मंत्रालयीन सहाय्यक या पदांसाठी राज्यातील सहा विभागांमध्ये विविध ८६९ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेत राज्यातील २ लाख ८६ हजार उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. ही परीक्षा देणा-या उमेदवारांना काही समजाकंटकांकडून संपर्क साधून त्यांना प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी ४० ते ४५ लाख रुपयांचा दर असून आता रक्कम नसल्यास नंतर देण्याची तरतूद असल्याचे सुद्धा संभाषण समाजमाध्यमांवर पसरल्याने उमेदवारांमध्ये एकच खळबळ माजली. गोंधळलेल्या स्थितीमध्ये अनेक उमेदवारांमध्ये २ फेब्रुवारीला होणारी परीक्षा होईल की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आयोगाने गुरुवारी पोलीसांकडे धाव घेतल्यावर पत्रकार परिषद घेऊन आयोगाची भूमिका स्पष्ट केली. काही उमेदवारांनी आयोगाला इ-मेलवर संपर्क साधून परीक्षांबाबत समाजमाध्यमांवर पसरलेल्या आमिषाची माहिती दिल्यावर आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे याबाबत रीतसर तक्रार केली आहे. 

उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. आयोगाकडे सर्वच प्रश्नपत्रिका कडेकोट बंदोबस्तामध्ये सुरक्षित आहेत. संबंधित बातमीत तथ्य नाही. उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही स्थितीमध्ये २ फेब्रुवारीची नियोजित गट – अराजपत्रित पदांसाठीची परीक्षा होणारच आहे. उमेदवारांना असे दूरध्वनी आल्यास secretay@mpsc.gov.in यावर तक्रार करावी. उमेदवारांनी अशावेळी विचलित न होता, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. पोलीसांची चौकशी सुरूच आहे.

डॉ. सुवर्णा खरात, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc exam will be held on 2nd february as question paper did not leaked says mpsc css