लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्यावतीने नेरुळ सेक्टर १ येथील छत्रपती शिवजी महाराज चौकाचा कायापालट करण्यात आला आहे. याच चौकात आकर्षक मेघडंबरीमध्ये सुमारे ४६ लाख ८५ हजार रुपये खर्चातून साकारलेला शिवयांचा सिंहासनारुढ पुतळा शिवजयंतीच्या मुहूर्तावर बसविण्यात यावा अशी मागणी शिवप्रेमींनी केली होती. शिवरायांचा पुतळाही आणून आर. आर. पाटील उद्यानात ठेवला आहे. मात्र सर्व कामे झाली असतानाही पालिकेने पुतळा बसवण्याच्या मुहूर्त हुकविल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात आला आहे.

पुतळा उभारण्यासाठी आवश्यक असलेली ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीही महापालिकेला प्राप्त झाली आहे. तसेच पुतळा निर्मितीचे कामही पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे १९ फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर नेरुळ सेक्टर १ येथील चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला पुतळा साकारण्यात येणार असल्याची तयारीही मागील काही दिवसापासून सुरू होती. पालिका अभियंता विभागाकडून येथील चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. परंतु शिवपुतळा बसवण्याचा शिवजयंतीचा मुहूर्त मात्र टळला असल्याने शिवप्रेमीमध्ये नाराजी आहे.

आतापर्यंत नेरुळच्या चौकाला शिवाजी चौक असे नाव होते. पण चौकात असलेल्या देखण्या मेघडंबरीत मात्र पुस्तक प्रतिमा साकारली होती. परंतु आता सिंहासनारुढ पुतळा साकारला जाणार आहे. या ठिकाणी पुतळा साकारण्याची मागणी माजी महापौर जयवंत सुतार तसेच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे देवनाथ म्हात्रे यांनी केली होती.

शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा आकारास येईल यासाठी आम्ही उत्सुक होतो. त्यासाठी शिवरायांच्या १४ गडावरील पाणी ,१०४ गडावरील माती आणून संकल्प पूजनही केले आहे. पालिकेने शिवजयंतीचा मुहूर्तावर महाराजांचा पुतळा बसवण्याचे टाळले असले तरी याच परिसरात मिरवणूक काढून शिवजयंती साजरी करणार आहोत. -देवनाथ म्हात्रे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट.

कारण गुलदस्त्यात

नेरुळ येथील शिवाजी चौकात पालिकेच्यावतीने मेघडंबरीत शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा बसवण्याबाबत तयारी सुरु होती. चौकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र पुतळा बसविण्याचा मुहूर्त हुकल्याचे कारण गुलदस्त्यात आहे. अधिकारी काहीच बोलत नाहीत तर आयुक्त प्रशासकीय कामासाठी शहराबाहेर असल्याने संपर्क झाला नाही.

Story img Loader