महाडजवळ सावित्री नदीवरील पुलाचा भाग पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक समस्यांचा पेटाराच उघडला आहे. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या मार्गावरील पोलादपूर ते कळंबोली या १५० किमीच्या टप्प्यात गेल्या चार वर्षांत एक हजार ३०१ अपघातांमध्ये २५६ जणांचा बळी गेला आहे. यातील अनेकांचे प्राण हे नजीक ट्रॉमा सेंटर नसल्याने गेले आहेत. अपघातानंतर पहिल्या एक तासात (गोल्डन अवर) उपचार मिळण्याच्या शक्यता त्यामुळे नष्ट झाल्या आहेत. अलिबाग आणि चंद्रपूर येथे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव असताना त्याची चंद्रपूर येथे अंमलबजावणी झाली आहे; मात्र अलिबाग अद्याप त्यापासून दूर आहे. या परिस्थितीला सरकारी लालफितीचा कारभार जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
कोकणासाठी अलिबाग येथे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. यामुळे ६०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याचा फायदा कोकणवासीयांना मिळण्याची शक्यता होती.
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासाठी रायगड जिल्ह्य़ातील राजकीय नेतृत्वाने एकत्र येण्याचा कधीच विचार केला नाही. त्यामुळे यावरून सर्व राजकीय नेत्यांची तोंडे उलटय़ा दिशेलाच राहिल्याचीच स्थिती असल्याची हताश प्रतिक्रिया जाणकार मंडळींनी व्यक्त केली आहे.
अलिबाग आणि पनवेलमध्ये ठाकूर विरुद्ध पाटील आणि पाटील विरुद्ध तटकरे, अशी लढाई सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सुविधांसाठी एकत्र कोण येणार, हा प्रश्न सध्या नागरिकांना सतावत आहे. वडखळ येथे ट्रामा सेंटरसाठी जागाही निश्चित झाली आहे. प्रत्यक्षातील केंद्राचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू आहे. सध्या पोलादपूर ते महाड या दरम्यान महामार्गावर अपघात झाल्यास संबंधित अपघातग्रस्तांना पुणे येथील खासगी रुग्णालयात आणि माणगाव ते पनवेल या दरम्यान अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना कामोठे व पनवेलमधील खासगी रुग्णालयांमध्ये आणले जाते. पनवेल येथील १०० खाटांचे व २० खाटांचे ट्रामा सेंटरचे रुग्णालयाची इमारत प्रत्यक्षात उभी राहण्यासाठी अजून २०१७ उजाडणार आहे. मागील पाच वर्षांपासून या रुग्णालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे.
खासगीत रस
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेत कोणत्याही राजकीय नेत्याला रस नसला तरी खासगी मालकीच्या महाविद्यालयांसाठी भूखंड मिळविण्याकरिता सरकारदरबारी अनेकांनी स्वत: राजकीय वजन वापरले आहे. याच वेळी स्वत:च्या तालुक्यात नवीन महाविद्यालय उभारण्यातही आली आहेत. याउलट राजकीय ताकद येथील राजकीय बडय़ा नेत्यांनी आपसातील कुरघोडीमध्येच वाया घालविल्याची चर्चा सामान्यांमध्ये आहे.