पनवेल : मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामाची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पनवेल येथील पळस्पे फाटा येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता येणार असल्याने पहाटेपासून रस्त्यांच्या दुभाजक पाण्याने स्वच्छ करण्याचे काम सरकारी यंत्रणेने हाती घेतले होते. मंत्र्यांना पाहणीदौ-यात महामार्ग चकाचक दिसण्यासाठीची सरकारी यंत्रणेची लगीनघाई सुरू होती.

परंतू या दौ-याच्या सुरुवातीला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने नेमकी महामार्गाची सद्यस्थिती काय आहे याची पाहणीसाठी आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री भोसले हे गुरुवारी दिवसभर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाच्या अधिका-यांकडून मुंबई गोवा महामार्गाचे काम नेमके का रखडले याची माहिती घेणार आहेत. मंत्र्यांचा दौरा गुरुवारी पळस्पे ते रत्नागिरी दरम्यान घेतला जाणार आहे. 

मुंबई गोवा महामार्गाचे काम आजही अपुर्णावस्थेत आहे. मागील वर्षी गणेशोत्सवापूर्वी तत्कालिन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोणत्याही स्थितीमध्ये महामार्गाचे पुर्ण केले जाईल असा दावा केला होता. परंतू अनेक ठिकाणी महामार्गाचे काम सुरु आहे. तर अनेक ठिकाणी भूसंपादनाच्या प्रश्नामुळे काही मीटरचे काम ठप्प आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पळस्पे फाटा (पनवेल) ते हातखांबा (रत्नागिरी) या २८१ किलोमीटरच्या पल्यावरील कामाची पाहणी करणार आहेत.

ठिकठिकाणी महामार्गावर काम सुरु असल्याने अचानक वळसा मार्ग असल्याने आणि त्याचठिकाणी पथदिव्यांची सोय नसल्याने रात्रीच्यावेळी अपघात होत असल्याने हा महामार्ग धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही विभागांकडून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असले तरी अपघातानंतर येथे रुग्णवाहिका आणि ट्रामासेंटर असलेल्या सरकारी रुग्णालयाची सोय नसल्याने रुग्णाचे हाल होत आहेत.    

गुरुवारी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना सांगीतले. कोकणवासीयांना या अपूर्ण रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या महामार्गाचे काम लवकर पुर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांतील अधिका-यांनी समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देऊ असे ते म्हणाले.

Story img Loader