बस क्लीनरशिवाय साताऱ्याहून मुंबईकडे रवाना
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या अपघाताने वाहतूक नियमांचे खासगी बसचालकांनी उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. अवजड वाहनांना तिसऱ्या मार्गिकेतून ताशी वेग ५० किमी. ठेवणे बंधनकारक असताना निखिल ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने खोपोलीनंतर बस पहिल्या मार्गिकेत ठेवली होती. त्यामुळे चालकाने वेगाचे उल्लंघन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याशिवाय चालकाच्या केबीनमध्ये आठ जणांना कोंबून बसविण्यात आले होते. हा सारा प्रकार महामार्गावर शनिवारी रात्रपाळीच्या वाहतूक पोलिसांना आणि प्रादेशिक विभागाच्या अधिकाऱ्यांना का दिसला नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खोपोली टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चालक इक्बालने बस तिसऱ्या मार्गिकेवर ठेवली होती. मात्र पनवेलच्या जवळ येताना तो पहिल्या मार्गिकेवर का आला असावा असाही प्रश्न पोलिसांना पडला आहे. अवजड वाहनांना द्रुतगती महामार्गावर तिसऱ्या क्रमांकाच्या मार्गिकेवरून चालणे बंधनकारक आहे या नियमांचे उल्लंघन या अपघातामुळे स्पष्ट समोर येत आहे.
आरटीओच्या अभिप्रायानंतर पोलिसांनी रविवारच्या दुर्घटनेबद्दल बसमालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.
पहाटेच्या वेळी बसमध्ये फक्त चालक होता. क्लीनर नसलेल्या बसमध्ये ४९ प्रवासी बसलेले होते. साताऱ्याहून बोरिवलीकडे ही बस निघाली होती. या वेळी चालकाच्या केबिनमध्ये आठ प्रवासी बसलेले होते. इक्बाल शेखने याची कोणतीही माहिती ट्रॅव्हल्सच्या व्यवस्थापकांना दिलेली नव्हती. त्यामुळे ही बस मुंबईकडे कशी काय सोडण्यात आली, सवाल केला जात आहे. मीनाक्षी गोडसे या ट्रॅव्हल्सच्या मालक आहेत. सातारा येथील एसटी आगाराजवळ निखिल ट्रॅव्हल्सचे कार्यालय आहे. बसच्या वाहतुकीदरम्यान परवाना नियमांविषयी ट्रॅव्हल्सने केलेल्या उल्लंघनाबाबत पोलिसांनी सातारा आणि पनेवल प्रादेशिक परिवहन विभागाकडे अहवाल मागितला आहे. हा अहवाल हाती आल्यानंतर पोलिसांच्या तपास कार्याची दिशा ठरणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा