पनवेल: यशवंतराव चव्हाण मुंबई पूणे द्रुतगती महामार्गावर मध्यरात्री अपघात झाल्यानंतर ४० मिनिटांनी पहिला रुग्ण कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा २४ पेक्षा अधिक रुग्णवाहिकांमधून भरुन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या नियोजनबद्ध कामामुळे जखमींना वेळीच उपचार मिळू शकले. ज्यावेळेस जखमींना रुग्णालयात आणण्यात आले त्यावेळेस एमजीएम रुग्णालयाच्या तब्बल ३५ डॉक्टर व ४० आरोग्यसेवक रुग्णांसाठी उपलब्ध होते. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविता आले.
१२ वाजून ४० मिनिटांनी द्रुतगती महामार्गावर सोमवारी मध्यरात्री अपघात झाल्यानंतर या द्रुतगती महामार्गावरुन जाणा-या एका जागरुक प्रवाशाने पोलीस नियंत्रण कक्षाला अपघाताची पहिल्यांदा माहिती दिल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाला सूरुवात झाली. नियंत्रण कक्षाने नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांना अपघाताची माहिती दिल्यावर आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाला सूरुवात झाली. उपायुक्त पानसरे व काकडे यांनी रात्रपाळीला उपस्थित असणारे तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिका-यांना घटनास्थळी पोहचण्याच्या सूचना केल्यानंतर काही मिनिटांत घटनास्थळी २४ हून अधिक रुग्णवाहिका पोहचल्या. आयआरबी कंपनीचे पेट्रोलिंग करणारे पथक, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सूरक्षा बल, वाहतूक व स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापनावेळी काम करणा-या सामाजिक संघटनेचे सदस्यांनी हे मदतकार्य केले. एमजीएम रुग्णालयात जखमींपैकी पहिला रुग्ण १ वाजून १७ मिनिटांनी आणण्यात आला. अपघात झालेले घटनास्थळ रुग्णालयापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. मात्र त्यादरम्यान जखमींना सूरक्षित खोल खड्यात पडलेल्या बसमधून बाहेर काढून त्यांना रुग्णालयापर्यंत पोहचविण्यात आले. दोनजण जागीच ठार झाली त्यापैकी एक महिला प्रवासी होती.
हेही वाचा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील सीसीटिव्ही कॅमेरा बंदच
सुर्वणकाळात जखमींना रुग्णालयापर्यंत नेता येण्यासाठी पोलीसांनी काही मिनिटांसाठी द्रुतगती महामार्गावरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली होती. कळंबोली मॅकडोनाल्ड हॉटेलसमोर वाहतूक बंद ठेवण्यासाठी तातडीने बंदोबस्त तैनात केल्या. मदतकार्य व आपत्ती व्यवस्थापनाच्या वाहनाशिवाय इतर कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला नाही. या दरम्यान जुन्या मुंबई पुण्या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. पोलीसांच्या याच नियोजनामुळे वेळीच जखमींना उपचार मिळाले.
हेही वाचा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात कसा झाला? चुक कोणाची? नेमकं काय झालं?
एमजीएम रुग्णालयाचे संचालक कुलदीप सलगोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार बसच्या अपघातानंतर ४६ जखमींना रुग्णालयात आणण्यात आले. यामध्ये ६ रुग्ण गंभीर होती. त्यापैकी दोघांना डोक्याला जबर मार आणि तिघांना छातीला मार व एकाला मनक्याला मार लागला होता. रुग्णावर उपचार करण्यासाठी तब्बल ३५ डॉक्टर व ४० आरोग्यसेवक रुग्णालयात असल्याने तातडीने जखमींचे कमी मार लागलेले, जास्त दुखापत असलेले व अत्यवस्थ असे वर्गीकरण करण्यात आले. ६ जणांवर तातडीने अति दक्षता विभागात उपचार सूरु करण्यात आले. तीघांना उपचारानंतर सोडण्यात आले. न्युरीसर्जन, ट्रामासर्जन व इतर डॉक्टरांचे पथक असल्याने तातडीने उपचार दिल्याची माहिती एमजीएमचे संचालक सलगोत्रा यांनी दिली.