वाहतूक क्षेत्रातील जाणकारांचे मत, मार्गातील उणिवा दूर करण्याची आवश्यकता
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातांचा आढावा घेतला असता एक बाब लक्षात येते, ती म्हणजे पुण्याहून येताना असलेल्या मोठय़ा उतारांच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर अपघात होत आहेत. या मार्गावर ठिकठिकाणी दुभाजक नसणे यांसारख्या अन्यही काही उणिवा आहेत. त्या दूर केल्यास आणि वाहनचालकांनी वेगमर्यादेसह ‘लेनच्या शिस्ती’चे पालन केल्यास हा ‘घातमार्ग’ पुन्हा एकदा प्रवासास सुरक्षित होईल, अशी आशा वाहतूक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
पुण्याहून मुंबईला येताना मार्गावर असलेल्या मोठय़ा उतारांवर वाहनचालकास गतीचा अंदाज येत नाही. त्यामुळे उतार कमी करणे हा उपाय अवघड वाटत असला तरी योजणे क्रमप्राप्त आहे, असे वाहतूक अधिकारी अजित बारटक्के सांगतात. या उतारांवरून जाताना वाहनांचा ताशी ३० किमी हा वेग सुरक्षित आहे. मात्र हा ‘आदर्शवादी’ वेग झाला. कोणतेही वाहन त्या वेगाने जात नाही. किंबहुना ताशी ८० किमी ही वेगमर्यादाही पाळत नाही. त्यामुळे मार्गावरील नागमोडी वळणे, मोठे उतार अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी चालकांना वेगाचे भान यावे याकरिताही वेगळ्या पद्धतीचे विद्युतफलक वा रोषणाई करावी असा एक अभिनव उपायही बारटक्के यांनी सुचविला आहे.
या रस्त्यावर दरड पडून अनेकदा वाहतूक कोंडी होते. ते रोखण्यासाठी ठिकठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात येत आहेत. मात्र रस्त्याच्या कडेला अशा सरळसोट उभ्या दरडी असणे हेच अशास्त्रीय असून, त्या हटविण्याची आवश्यकता यापूर्वीही अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे.
रस्त्यांतील उणिवा दूर करण्याबरोबरच बेफाम वेगाने जाणाऱ्या वाहनांना आवर घालणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता मार्गावर दर २५ किमी अंतरावर स्पीडगनकरिता टॉवर उभारावेत, असा उपायही सुचविण्यात येत आहे. याचप्रमाणे अन्य एक महत्त्वाचा उपाय म्हणजे ई-चालानची व्यवस्था. वाहनमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना होणाऱ्या दंडाची रक्कम थेट त्याच्या बँक खात्यातून वसूल करता यावी अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत, विशेष म्हणजे, काही वाहतूक अधिकाऱ्यांनीच व्यक्त केले. मात्र ई-चालानबरोबरच दंडाची रक्कमही भरभक्कम असावी, असे ते म्हणाले.
भक्कम दुभाजक गरजेचे
या मार्गावरून जाताना सातत्याने जाणवणारी बाब म्हणजे तेथे अनेक ठिकाणी दुभाजक नाहीत. परिणामी इकडील वाहन तिकडच्या वाहनांवर आदळून अपघात झाले आहेत. त्यामुळे मार्गामध्ये लोखंडी आणि वेगाने वाहन धडकले तरी भक्कम असे दुभाजक गरजेचे असल्याचे मतही व्यक्त करण्यात येत आहे.