मुंबई-पुणे महामार्गावर अपघातात १७ ठार , पाच वर्षांत अडीच हजार दुर्घटनांत ६०० हून अधिक बळी
मुंबई-पुणे या दोन महानगरांना जोडणारा द्रुतगती मार्ग दिवसेंदिवस मृत्यूसापळ्यांचा मार्ग बनत चालला असून रविवारी पहाटे या मार्गावर पनवेलनजीक झालेल्या भीषण अपघातात १७ जण ठार तर ४७ प्रवासी जखमी झाले. गेल्या पाच वर्षांत या मार्गावरील अडीच हजार अपघातांनी ६०० हून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे द्रुतगती मार्गावरील सहा अपघातप्रवण ठिकाणांवर उपाययोजना करण्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाच वेळा स्मरणपत्रे देऊनही त्याकडे संबंधितांनी डोळेझाकच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
द्रुतगती मार्गावर पनवेलनजीक शेडुंग गावाजवळ एक खासगी प्रवासी बस स्विफ्ट व इनोव्हा या दोन गाडय़ांवर आदळून रस्त्यालगतच्या खोल खड्डय़ात कोसळली. या भीषण अपघातात १७ जण ठार तर ४७ जण जखमी झाले. जखमींना तातडीने महात्मा गांधी मिशन (एमजीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये महर्षी दयानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक अविनाश कारंडे (३९) यांचा समावेश आहे. या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरील सर्वाधिक अपघात पुण्यातून मुंबईला येताना होतात. त्यात मार्गावर उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिल्याने, भरधाव अवजड वाहनांच्या धडकेमुळे आणि वाहनांवरील चालकाचा ताबा सुटल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे.
अपघाताचे वृत्त समजताच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. जखमींवर सरकारतर्फे मोफत उपचार केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा