मुंबईहून पुण्याला जाणारा द्रुतगती मार्ग हा सामान्य प्रवाशांप्रमाणेच या मार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमलेल्या महामार्ग वाहतूक पोलिसांसाठीही घातमार्गच ठरत आहे. आतापर्यंत या मार्गावर सहा पोलिसांचा वाहतूक नियमन करताना मृत्यू झाला असून, अनेक पोलीस जखमी झाले आहेत. इतरांचे प्राण वाचविण्यासाठी वेळीच धावून जाणाऱ्या या पोलिसांशी बोलल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीची देखरेख करणारी सरकारी यंत्रणा किती कालबाह्य़ आहे, याची खात्री पटते.
या ९४.५ किलोमीटरच्या अंतराच्या मार्गावर कळंबोली, पळस्पे, खालापूर व वडगाव अशी चार पोलीस ठाणी लागतात. त्यांच्यावर जबाबदारी वाहतूक नियमनाची. अपघात घडला की वाहनांच्या अनेक किलोमीटरच्या रांगा येथे लागतात. पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यासाठी या मार्गावर सेवा रस्त्याची तरतूदच नाही.
मार्गावर सातत्याने पोलिसांची गस्त असावी अशी ओरड सर्व स्तरांतून होत असते. मात्र या पोलिसांकडे असलेली साधनसाम्रगी पाहता त्यांची कीवच यावी. निम्म्याहून अधिक अपुरे पोलीस बळ ही या यंत्रणेची अवस्था. त्यामुळे महामार्गावर रात्री एखादा अपघात झाल्याखेरीज पोलीस दिसणार नाहीत. रात्रीची कारवाई बंद असा अलिखित फतवा या पोलिसांनी यासाठीच काढला आहे. वस्तुत या मार्गावर देखरेखीसाठी स्वतंत्र उपायुक्त दर्जाचा पोलीस अधिकारी नेमून त्याच्या हाताखाली सुमारे २५० पोलीस असणे गरजेचे असल्याचे काही अधिकारी सांगतात.
पोलिसांकडील गस्तीसाठीची सर्व वाहने जुनाट आहेत. अशाच एका पोलीस गाडीच्या खालच्या पत्र्याला चक्क ठिगळ लावल्याचे एका पोलिसाने दाखविले. पोलिसी भाषेत या वाहनांना ‘कंडम’ असे संबोधले जाते. मध्यंतरी राज्याच्या मंत्र्यांनी या महामार्गाचा दौरा करून पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. त्यावेळी मंत्र्यांनी महामार्गावर केलेल्या जलदगतीच्या प्रवासावेळी अशीच कंडम वाहने मंत्र्यांच्या ताफ्यात धापा टाकत पळत होती. शहरात एवढी जुनी वाहने वापरण्याचा अधिकार सरकारने सामान्यांकडून काढून घेतला आहे. पण तशी वाहने हे पोलीस वापरतात आणि स्वतच्या जिवाशीही खेळ करतात.
महामार्ग पोलीस व प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या अधिकाऱ्यांनी हा मार्ग बांधल्यापासून येथे अवैध प्रवासी वाहतुकीसाठी मोहीम हाती घेतलेली नसल्याची धक्कादायक माहिती एका जाणकार पोलिसानेच दिली. या महामार्गावरील अपघातांना बेफाम वेग जबाबदार आहे. हा वेग मोजण्यासाठीच्या स्पीडगन येथे सरकारने नव्हे तर खासगी कंपनीने या पोलिसांना दिल्या आहेत. त्याही अवघ्या चार. त्यातील एक नादुरुस्त. ही गन बॅटरीवर चालते. ती किती तास चार्ज करायची आणि किती तास कारवाईसाठी उभी करायची हा पोलिसांपुढचा नेहमीचा प्रश्न. संपूर्ण मार्गवर किमान ६० ब्रेथ अॅनालायझर व तेवढय़ाच स्पीडगन आणि कारवाईसाठी पुरेसे पोलीस बल असल्याशिवाय मद्यपी चालक, अवैध प्रवासी वाहतूक करणारे, वेगमर्यादा ओलांडणारे यांना लगाम घालता येणार नाही, असे येथील हतबल पोलीसच सांगत आहेत.
वर्ष वेगमर्यादा उल्लंघनाची कारवाई मद्यपी चालकांवरील कारवाई
२०१३ ४६४१ ३१
२०१४ ११८६ २५
२०१५ ३४७ १६
मे २०१६ ११६५ २१
* या मार्गावर आजवर सर्वाधिक अपघात हे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे झाले आहेत. मात्र अशी वाहतूक रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा काम करत नाही.
* मार्गाच्या सुरुवातीला आणि शेवटी स्थानिक वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करावी असा अलिखित नियम येथे पोलिसांनीच घालून घेतला आहे.