पीएमसी बँकेत खाते उघडल्याचा फटका; पनवेल पालिकेची कारवाई :- पनवेल शहर महापालिकेचे बँक खाते पंजाब व महाराष्ट्र को-ऑप. बँकेत उघडणाऱ्या पालिकेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांना स्थायी समितीच्या सभापतींनी सक्तीच्या रजेवर जाण्याच्या सूचना शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये दिल्या. मनोजकुमार शेटे असे या अधिकाऱ्यांचे नाव असून शेटे हे मागील वर्षी मे महिन्यात पनवेल पालिकेत रुजू झाले होते. पीएमसी बँकेत पनवेल पालिकेचे साडेदहा कोटी रुपयांची रक्कम अडकली आहे. सध्या या विभागाचा पदभार शेखर खांबकर या साहाय्यक आयुक्तांकडे सोपविण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
पीएमसी बँकेत खाते उघडण्याचा प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने शेटे यांनी आयुक्त देशमुख यांच्यासमोर मांडल्याचा ठपका शेटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बँक खाते उघडताना त्यांच्याकडून सहकारी बँक असा शब्द लिहिला गेला नसल्याची दुसरी चूक अनावधानाने झाल्याचे शेटे यांनी सांगितले. शेटे यांच्या याच चुकीमुळे उपायुक्त व इतर सक्षम अधिकाऱ्यांनी त्या बँकेची निवड करतानाच्या अर्जावरही स्वाक्षरी करून बँक खाते सुरू केले. ही चूक ध्यानात येईपर्यंत संबंधित खात्यामध्ये १० कोटी रुपयांच्या पुढील रक्कम जमा झाली होती. त्यानंतर या बँकेतील व्यवहारांवर र्निबध आले होते.
शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत शेटे यांना त्यांची प्रतिनियुक्तीवरून आलेल्या ठिकाणी पुन्हा पाठविण्याचा निर्णय सभापती प्रवीण पाटील यांनी घेतला होता. आयुक्तांची दिशाभूल करून हे खाते उघडल्याचे स्पष्ट झाल्यावर स्थायी समितीच्या सदस्यांनी यावर संताप व्यक्त केला.