पनवेल : महापालिका क्षेत्रातील कामोठे येथील मलनिःसारण केंद्रांमधील १५ दशलक्ष लीटर क्षमतेच्या पाण्याचे पुनर्वापर प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी महापालिकेने दुसऱ्यांदा निविदा जाहीर केली आहे. या प्रकल्पासाठी महापालिका ७३ कोटी ६१ लाख रुपये खर्च करणार आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उपनगरातील उद्यान, शौचालय, वाहने धुण्यासाठी तसेच कारखान्यांमध्ये होऊ शकणार आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात २२० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असते. केंद्र सरकारने प्रत्येक शहराच्या पुरवठ्यापैकी २० टक्के पाण्याचा वापर झाल्यावर ते पाणी वाया जाण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करुन ते वापरण्यायोग्य बनविण्याचे निर्देश आहेत.
पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी केंद्र सरकारच्या या निर्देशामुळे कामोठे येथील मलनिःसारण केंद्रातून वाया जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया जाहीर केली आहे. यापूर्वी याबाबत विविध कंपनीकडून बोली मागविण्यात आल्या होत्या. मात्र एकाच कंपनीने यामध्ये स्वारस्य दाखविल्यामुळे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे यांनी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली आहे.
निविदा अंतिम झाल्यानंतर कंपनीच्या निवडीनंतर दीड वर्षांचा काळ प्रकल्प उभारण्यासाठी लागणार आहे. या पुनर्वापरित पाण्याचा वापर कृषी, औद्योगिक तसेच बागायतीसाठी केला जाऊ शकतो. यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळला येईल. पनवेल महापालिका क्षेत्रात उन्हाळ्याच्या दिवसात ५० एमएलडी पाण्याची तूट भासते. पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यास यातून जलदिलासा मिळू शकेल. कामोठे उपनगरातील या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर पनवेल महापालिका पनवेल शहरातील ५ एमएलडी मलनिःसारण केंद्रातून वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रकल्प हाती घेणार असल्याची माहिती पालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता विलास चव्हाण यांनी सांगीतले.
विमानतळासाठी उपयोग?
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये मलनिःसारण केंद्रातून प्रक्रिया व शुद्धीकरण केलेल्या पाण्याची मागणी शहरी भागातून होत नसल्यास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील वातानुकूलित यंत्रणेच्या शीतकरण प्रकल्पाला या पाण्याचा पुरवठा केला जाऊ शकेल अशी सुद्धा शक्यता पालिकेच्या सूत्रांकडून वर्तविली जात आहे.