‘सीएसआर’मधून निधी उभारण्याचा आमदार म्हात्रे यांचा इशारा
नवी मुंबई : करोनाकाळातील अनुभव लक्षात घेऊन नवी मुंबईकरांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, याकरिता आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे सिडकोकडून भूखंड सवलतीच्या किमतीत उपलब्ध झाला असतानाही महापालिका ही किंमत भरण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळे रुग्णालयाची उभारणी रखडण्याची शक्यता पाहून मंदा म्हात्रे यांनी पालिकेला आठ दिवसांची मुदत दिली आहे. पालिकेने निधी न दिल्यास सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) रुग्णालय उभारावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सिडकोने नवी मुंबई शहर वसविताना विशेष रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी बाजारभावात व काही सवलतीच्या दरात भूखंड दिले; मात्र एखादे विशेष रुग्णालय उभारण्यात रस दाखविला नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांची मक्तेदारी वाढल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबई पालिकेला प्रारंभीच्या काळात वाशी येथे दोन एकरचा भूखंड सिडकोने दिला. या भूखंडावर पालिकेने बांधलेल्या इमारतीतील दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळ एका खासगी रुग्णालयाला देण्यात आले आहे. मात्र, येथील उपचारांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. करोनाकाळात ही समस्या अधिक प्रकर्षांने समोर आली. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेचे स्वतंत्र असे अद्ययावत रुग्णालय उभारावे, यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बेलापूर सेक्टर १५ अ येथे (पालिका मुख्यालयाजवळ) आठ एकरचा भूखंड देण्याची मागणी केली. या वेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी हे उपस्थित होते. हा भूखंड आठ दिवसांत पालिकेला हस्तांतरित करण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थापकीय संचालकांना दिल्याने या भूखंडांची हस्तांतरण प्रक्रिया सुरू आहे.
या विस्तीर्ण भूखंडासाठी सिडकोला सवलतीच्या दरातील १०७ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. पालिकेचा निधी हा जनतेचा असल्याने लोकहितार्थ उभ्या राहणाऱ्या रुग्णालयाचा भूखंड सिडकोने मोफत द्यावा असे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या हालचालींत भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमी वर मंदा म्हात्रे यांनी पालिकेला आठ दिवसांची मुदत दिली आहे. ‘रुग्णालय, महाविद्यालय, परिचारिका प्रशिक्षण यांसारख्या समाजहित कामासाठी पालिकेचा खर्च झाला तर तो जनतेचा पैसा खऱ्या अर्थाने उपयोगी येणार आहे. पालिकेने पैसे भरले नाहीत तर सीएसआर निधीतून रुग्णालय उभारण्याचा विचार करावा लागेल,’ असे म्हात्रे यांनी सांगितले.
शहरात शासकीय विशेष सुविधांयुक्त रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला आणि तो पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. पालिका काही अनावश्यक प्रकल्पांवर कोटय़वधी रुपये खर्च करीत आहे. लवकरच त्याचा लेखाजोखा मांडला जाईल.
– मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर