नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहरातील मलनिःसारण केंद्रामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करुन शुद्ध केलेले पाणी समुद्रात सोडले जात होते कोट्यावधी रुपये खर्च करुन प्रक्रिया केलेले वापरायोग्य पाणी समुद्रात सोडण्याची वेळ महापालिकेवर दोन हजार नऊ पासून आली होती. परंतू नेरुळ,बेलापूर विभागातील ३० उद्याने हरितपट्टे यांना मोरबेतील पिण्याचे पाणी वापरण्याऐवजी मलनिःसारण केंद्रातील प्रक्रिया युक्त पाणी पाईपलाईनद्वारे दिले जात असून त्याच धर्तीवर ऐरोली व कोपरखैरणे येथील प्रक्रियायुक्त पाणी उद्योजकांबरोबरच ठाणे बेलापूर मार्गालगतचे हरितपट्टे,कोपरखैरणे,ऐरोलीतील उद्याने यांना वापरण्याबाबतचे नियोजन असून दुसरीकडे प्रक्रियायुक्त पाणी कंपन्यांना देण्याचा श्रीगणेशा झाला आहे. जास्तीत जास्त कंपन्यांना प्रक्रियायुक्त पाणी देण्यासाठी आग्रही असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.
नवी मुंबई महापालिकेने शहरात ८०० कोटी रुपये खर्च करुन ६ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे एसटीपी केंद्र उभारले आहेत.या एसटीपी केंद्रातून जवळजवळ दररोज एकशे पंच्याऐंशी ते जास्तीत जास्त दोनशे वीस एमएलडी प्रक्रियायुक्त शुध्द पाणी तयार केले जाते.त्यानंतर तयार केलेले पाणी वापराविना बहुतांश पाणी समुद्रात सोडण्याची नामुष्की मागील नऊ वर्षापासून पालिकेवर येत होती. पर्यावरण संतुलनाबरोबरच मलनिःसारण केंद्रातून शुध्द केलेल्या पाण्याची विक्री करुन पालिकेला उत्पन्न मिळावे अशी सुरवातीला अपेक्षा होती.परंतू एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केले जाणारे पाणी घेण्यास कोणीही तयार नव्हते.
हेही वाचा : समुद्रात येणाऱ्या लाखो टन कचऱ्यामुळे निर्माण होतेय जलप्रदूषणाची गंभीर समस्या
महाराष्ट्र शासनाने मलनिःसारण वाहिन्यातून येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करुन लाखो लिटर प्रक्रियायुक्त पाणी कंपन्यांना वापरणे बंधनकारक केले आहे. महपालिकेनेही अमृत योजने अंतर्गत .नेरुळ विभागातील ३० उद्यानांना हे एसटीपीचे प्रक्रियायुक्त पाणी पाईपलाईद्वारे दिले जात आहे. नेरुळ सेक्टर ५० येथील एसटीपी केंद्रातून हे प्रक्रियायुक्त पाणी दिले जात आहे. तसेच बेलापूर विभागातील महत्वाची व मोठी असलेली वंडर्स पार्क,रॉक गार्डन,ज्वेल ऑफ नवी मुंबई,आर.आर.पाटील उद्याने अशा अनेक उद्यानात प्रक्रियायुक्त पाणी दिले जात असून दुसरीकडे कोपरखैरणे येथील प्रक्रियायुक्त पाणी कंपन्यांना देण्यास सुरवात झाली आहे.
हेही वाचा : नवी मुंबई शहरातून आठ महिन्यात ६ हजार किलो ई कचरा संकलित
कोपरखैरणे,ऐरोली विभागातही उद्याने व हरितपट्टे यांना प्रक्रियायुक्त पाणी…..
पालिकेने कोपरखैरणे येथील प्रक्रियायुक्त पाणी तुर्भे येथील उद्योजकांना देण्यास सुरवात केली असून जास्तीत जास्त उद्योगांनी हे प्रक्रियायुक्त पाणी घेण्यासाठी पालिका पाठपुरावा करत असून नेरुळ बेलापूर प्रमाणेच प्रक्रियायुक्त पाणी ठाणे बेलापूर मार्गालगतचे हरितपट्टे तसेच ऐरोलीतील उद्यानांना हे पाणी देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. आता पालिकेने जवळजवळ ५ एमएलडी पाणी ६ कंपन्यांना देण्यास सुरवातही केली असून प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर उद्याने व हरितपट्टे यांना देऊन पिण्याच्या पाण्याची बचतही केली जाणार आहे.- मनोज पाटील, सह शहर अभियंता