लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : दिवाळी जवळ आली की नोकरदारांना बोनसचे वेध लागतात. त्याप्रमाणे सर्व महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान किती मिळणार याची उत्सुकता असते. यंदा नवी मुंबई आणि पनवेल या दोन्ही महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून घसघशीत रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून मिळणार आहे. नवी मुंबई महापालिकेने यंदा ३० हजार रुपये तर पनवेल महापालिकेनेही २७ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. दिवाळीपूर्वी या रकमा संबंधित कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

नवी मुंबई महापालिकेतील करार व तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपये तर आशा वर्कर यांना १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. ठोक मानधनावरील कर्मचारी, किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करारावरील वेतनश्रेणीतील कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्यसेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना २४ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. सानुग्रह अनुदानास प्राप्त असे एकूण ४ हजार ५९९ कर्मचारी नवी मुंबई महापालिकेत आहेत.

आणखी वाचा-उरणच्या खेळाडूंना मैदानाची एका तपापासून प्रतीक्षा

पनवेल महापालिकेच्या ५९५ कर्मचाऱ्यांना २७ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार असून पालिकेच्या कायम कर्मचाऱ्याबरोबर पालिका कंत्राटी ३१५ कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये प्रोत्साहन भत्ता तसेच पनवेल गावातील २७ कुष्ठरोग बांधवांना चार हजार रुपये दिवाळीपूर्वी देणार आहे.

पनवेल महापालिकेमुळे पालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर्जा उंचावल्याचे पाहायला मिळत आहे. म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर, सरचिटणीस अनिल जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, अनंत पाटील, दत्तगुरु म्हात्रे, संजय जाधव, मुकेश वाघेला, ईश्वर झंजोट, रवींद्र जाधव, राकेश परदेशी, व इतर कर्मचारी यांनी आयुक्त देशमुख यांच्याबरोबर पालिकेच्या स्थापनेपासून कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भात तसेच सानुग्रह अनुदानाबाबत चर्चा केली होती.

आणखी वाचा-नवी मुंबई : लॉजिस्टिक पार्कला बेकायदा बांधकामांचा विळखा

या मागणीसाठी वेळोवेळी सकारात्मक चर्चा आयुक्त गणेश देशमुख यांनी केली. तसेच आ. प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, प्रकाश बिनेदार या प्रत्येकाने पाठपुरावा केल्याने त्यांचेही आभार आम्ही मानतो. -अनिल जाधव, सरचिटणीस, मुन्सिपल एम्प्लॉईज युनियन

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation employees will get diwali bonus mrj
Show comments